तंत्रज्ञान स्नेही अध्यापकत्व : १
उत्तम
अध्यापक होण्यासाठी विषयज्ञान आणि अध्यापनशास्त्राचे ज्ञान या दोन प्रमुख विचार
आणि कार्यक्षेत्रांवर अध्यापकाला प्रभुत्व मिळवावे लागते. विषयज्ञानात ज्या
विषयाचे अध्यापन करायचे त्यासंदर्भातील आशयावर प्रभुत्व असणे आणि अध्यापनशास्त्राच्या
ज्ञानात अध्ययन- अध्यापन प्रक्रियेची अध्यापकाला असलेली जाण हे दोन प्रमुख घटक आहे. ( शुलमन, १९८७ ). विषयज्ञान आणि
अध्यापनशास्त्राचे ज्ञान या दोन प्रमुख विचार आणि कार्यक्षेत्रांचा योग्य समन्वय
साधता आला तरच अध्यापनाची परिणामकारकता वाढते.
गेल्या
शतकात या दोन प्रमुख विचार आणि कार्यक्षेत्रांच्या जोडीला शैक्षणिक तंत्रज्ञान या
तिसऱ्या विचार आणि कार्यक्षेत्राची भर अध्यापनाच्या प्रक्रियेमध्ये पडली आहे.
चांगला अध्यापक होण्यासाठी अध्यापकाला आशयाचे विश्लेषण करून योग्य अध्यापन पद्धती
व साधनांचा वापर करून विद्यार्थ्याला पचेल अशी अध्ययन गुटिका तयार करता आली तर
विद्यार्थी अध्ययन अनुभवात सहभागी होऊन तो आशय ग्रहण करू शकतो.
गेल्या
पाचसहा वर्षांत अनेक शाळांमध्ये ई लर्निंगची सुविधा उपलब्ध झाली आहे आणि त्यासाठी
मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली गेली आहे आणि या करोना महामारीमुळे आलेल्या आपत्तीच्या
काळात तंत्रज्ञानाचा शिक्षणप्रक्रियेमधील सहभाग वाढतच जाणार आहे. तसेच यासाठी मोठी
आर्थिक गुंतवणूक होणार असल्याने अध्यापनाच्या परिणामकारकतेचे मूल्यमापन करण्याचा आग्रह वाढतच जाणारा असेल.
शिक्षक
प्रशिक्षणाच्या निमित्ताने शाळांशी आणि शिक्षकांशी जेव्हा संवाद होतो तेव्हा
त्यांना विषयज्ञान , अध्यापनशास्त्राचे
ज्ञान आणि तंत्रज्ञान या तीन विचार आणि कार्यक्षेत्रांचा समन्वय आणि समवाय साधताना अडचण येत असे लक्षात येते. या लेखात या तीनही क्षेत्रांचा
एकत्र विचार करणाऱ्या प्रतिमानाच्या ( TPCK / TPACK : Technological
Pedagogical Content Knowledge; Mishra & Koehler,२००६ ) आधारे
काही मांडणी करणार आहे.
१. तंत्रज्ञानाचे ज्ञान ( TK ) :
शिक्षण क्षेत्राला तंत्रज्ञान खरेतर नवीन नाही. शिक्षणासाठी
प्रारंभापासूनच तंत्रज्ञान वापरले जाता आहे. धूळपाटी, खडू,
फळा, पेन्सिल या गोष्टीदेखील तंत्रज्ञानच
आहेत. पण आता सरावाच्या झाल्या आहेत.
खालील लिंकवर क्लिक करून शिक्षणात तंत्रज्ञानाचा समावेश कसा होत गेला
आणि त्याने शिक्षणाचे स्वरूप कसे बदलले याचा आढावा घेता येईल.
https://www.youtube.com/watch?v=UFwWWsz_X9s
https://www.youtube.com/watch?v=UFwWWsz_X9s
या वस्तुरूप तंत्रज्ञानाबरोबर खरेतर अक्षरे आणि अंक हे पण एक प्रकारचे
तंत्रज्ञानच आहे. अंकांतील संबंध व त्यांच्या वापराची गरज लक्षात घेवून तयार
केलेले पाढे हे पण एका प्रकारचे तंत्रज्ञानच आहे.
खरेतर ज्ञानाच्या निर्मितीनंतर
मानवी समाजासाठी ज्ञान उपलब्ध होण्यासाठी तंत्रज्ञान हेच उपयोगी ठरले आहे. मानवी
इतिहास पाहिला तर तंत्रज्ञानाची उपलब्धता कोणाला असते,
कोणाला नसते हेच सर्व वादांचे आणि भेदांचे कारण आहे. आजही या करोना महामारीच्या काळात इंटरनेट तंत्रज्ञानाची उपलब्धता असलेले
आणि नसलेले असे दोन वर्ग समाजात तयार झाले आहेत.
इतिहास बघितला तरी लक्षात येईल ज्यांची स्मरणतंत्र
चांगली होती अशांसाठीच ज्ञान उपलब्ध होते. पुढे पुस्तक लिहिण्याचे तंत्रज्ञान आले
आणि ज्ञान थोडे खुले झाले. छपाईच्या तंत्रज्ञानाच्या
विकासानंतर ज्ञान मुक्त झाले आणि गेल्या काही वर्षांत आंतरजालावर माहितीचा स्फोट
झाला आणि ज्ञान प्रत्येकाच्या हाताशी आले. खरेतर माहिती
की ज्ञान उपलब्ध झाले हा स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. पण तंत्रज्ञानाने ज्ञान
मिळवण्याच्या संधी विस्तारत गेल्या हे खरे आहे.
२. विषयाचे ज्ञान ( CK ) :
विषय ज्ञानात समृद्धी हा महत्त्वाचा घटक आहे. एखाद्या
विषयाशी निगडीत माहिती, कल्पना,
सिद्धांत, संबोध असे विषयज्ञानाचे अनेक घटक
आहेत. विषयाची माहिती असणे ते विषयज्ञानाचे उपयोजन
करता येणे हे विषयज्ञानाच्या प्रभुत्वाचे विविध टप्पे आहेत. एका विषयातील संबोध
आणि संकल्पनाच्या अन्य विषयातील संबोध आणि संकल्पनांशी असलेले नाते माहीत असणे हे
अध्यापकाच्या विषयज्ञानाच्या समृद्धीचे लक्षण आहे.
३. शिक्षणशास्त्राचे ज्ञान ( PK ) :
अध्ययन-अध्यापन प्रक्रिया, अध्यापन पद्धती आणि अध्यापनाची प्रतिमाने,
वर्ग व्यवस्थापन, मूल्यमापन, पाठ नियोजन, शैक्षणिक मानसशास्त्र इ. शिक्षण
प्रक्रियेसंदर्भातील गोष्टींचा समावेश शिक्षणशास्त्राच्या ज्ञानामध्ये होतो.
या
तीन महत्त्वाच्या गोष्टी एकमेकांत कशा गुंफलेल्या आहेत याचा आता विचार करूया.
४. शिक्षणशास्त्र आणि विषय ज्ञानाची गुंफण ( PCK
) :
एखादी संकल्पना शिकण्यासाठी ती संकल्पना आणि संकल्पना समजून
घेण्यासाठी विद्यार्थ्याने कृती व विचार करावा यासाठीचा शैक्षणिक अनुभव यांची
सांगड अध्यापकाला घालता येणे महत्त्वाचे आहे. पाठ नियोजनाच्या वेळी विद्यार्थ्याने
काय शिकायचे आणि कसे शिकायचे याबद्दल अध्यापकाने विचार करण्याचे हे
क्षेत्र आहे.
५. तंत्रज्ञान आणि विषयज्ञानाची गुंफण ( TCK
) :
प्रत्येक तंत्रज्ञानाची एक ताकद असते, तसेच काही मर्यादा
असतात. एखादी संकल्पना शिकवताना कोणते तंत्रज्ञान उपयोगी ठरेल याचा विचार या
क्षेत्रात केला जातो. त्यामुळे पाठ नियोजनाच्या वेळी
याबद्दल अध्यापकाने विचार करण्याचे हे क्षेत्र आहे.
६. तंत्रज्ञान आणि
शिक्षणशास्त्राची गुंफण ( TPK ) :
तंत्रज्ञान आणि शिक्षण यांचे जवळचे नाते आहे. संबोध निर्मितीमध्ये तंत्रज्ञान उपयोगी ठरत असल्याने शिक्षकाला हे नाते
माहिती असणे अतिशय महत्त्वाचे आहे.
आशयाच्या स्वरूपानुसार तो आशय समजून घेण्यासाठी कोणते तंत्रज्ञान
उपयोगी पडेल याचा निर्णय करावा लागतो. म्हणजेच कशाच्या साह्याने आणि कसे
शिकायचे याबद्दल पाठ नियोजनाच्या वेळी अध्यापकाने विचार करण्याचे हे
क्षेत्र आहे.
वरील सहा प्रकारांबद्दल स्वतंत्र विचार केल्यानंतर या गुंफणीची पेड
घालता यायला हवी.
७. तंत्रज्ञान - शिक्षणशास्त्र
–विषयज्ञान ( TPACK ) या तिन्हीच्या ज्ञानाची पेड :
कोणतेही ज्ञान मिळवण्यासाठी आशयाचे स्वरूप, योग्य अध्यापन पद्धती आणि योग्य तंत्रज्ञान या तिन्हीचा मेळ साधणे
महत्त्वाचे आहे. म्हणजेच काय शिकायचे, कसे शिकायचे आणि कशाच्या साह्याने शिकायचे या तिन्हींचे एकत्रीकरण जेव्हा
होते, तेव्हाच एखाद्या पाठाचे उत्तम नियोजन होऊन अध्यापन
प्रभावी होऊ शकते.
इयत्तेनुसार आशयाचे तपशील विस्तारतील, विद्यार्थी आणि
शिक्षकांच्या क्षमतांनुसार अध्ययन-अध्यापन पद्धतीची निवड होईल आणि संसाधनांच्या
उपलब्धतेनुसार तंत्रज्ञान उपलब्ध होईल. या तिन्हींची उत्तम पेड घालता आली तर पाठ
प्रभावी होऊ शकेल.
या
लेखाची मांडणी करत असताना बी.एड. करत होतो तेव्हा एका प्राध्यापकांबरोबर झालेला
संवाद आठवला. शैक्षणिक तंत्रज्ञान या विषयाअंतर्गत एका प्रात्यक्षिक कार्यासाठी एक
शैक्षणिक साधन करायचे होते. ओव्हर हेड प्रोजेक्टच्या (OHP) पारदर्शिका (ट्रान्सपरन्सी) तयार करून जमा करायला सांगितल्या होत्या. मी जीवशास्त्रातील एक माहिती प्रधान आशय
निवडून त्या माहितीचा सारणी तक्ता तयार केला होता. सुमारे आठ पानांची माहिती एका सारणी तक्त्यात मांडली होती. ती पारदर्शिका जमा
केल्यावर प्राध्यापक मला म्हणाले की माहिती काय, तोंडीपण सांगता येते.
त्याऐवजी तुम्ही आकृती असलेला आशय निवडून त्याबद्दलची पारदर्शिका
तयार करा. माझे म्हणणे होते की तासाच्या वेळी माहिती सांगताना काही तपशील सुटू
शकतात, वेळेच्या मर्यादेत काही वेळा कमी उदाहरणे तोंडी
सांगितली जावू शकतात, त्यामुळे असा माहितीप्रधान आशय
कमी वेळात मुलांसमोर ठेवताना पारदर्शिका वापरणे योग्य.
माझ्या शिक्षकांचे म्हणणे होते, आकृती
काढण्यात वेळ जातो, वर्गाकडे पाठ असल्याने वर्ग
नियंत्रण कमी होते त्यामुळे त्याची पारदर्शिका करा. त्यावर माझे म्हणणे होते की
आकृती काढणे हे कौशल्य आहे आणि मी आकृती
मुलांसमोर फळ्यावर काढल्यास त्यांना आकृती काढायची प्रक्रिया समजेल आणि मला आकृती
काढता येते, त्यामुळे त्याच्या पारदर्शिकेची गरज नाही. हे
म्हणणे काही त्यांना मान्य होत नव्हते. शेवटी मी दोन पारदर्शिका जमा करून
व्यावहारिक प्रश्न सोडवला.
आज या चर्चेकडे वळून बघताना असे वाटते की उत्तम पाठ नियोजन
होण्यासाठी आशय, अध्यापन पद्धती आणि तंत्रज्ञानाच्या आधी
आपल्या अध्यापनाच्या उद्दिष्टांबद्दल विचार होणे
महत्त्वाचे आहे. लेखाच्या भाग २ मध्ये TPACK प्रतीमानाच्या
आधारे अध्यापकाने पाठ नियोजन करण्यापूर्वी कसा विचार करावा हे एका आराखड्याच्या
सहायाने समजावून घेवू.
प्रशांत दिवेकर
ज्ञान प्रबोधिनी, पुणे
Well written
ReplyDeleteKartik Digamber Akat
ReplyDeleteशास्त्रशुद्ध आणि अतिशय उपयुक्त
ReplyDeleteसध्याच्या स्थितीत खूपच उपयोगी माहिती मिळाली आहे.👍
ReplyDeleteसर, आपण एक चांगला विषय हाती घेतला असून त्याचा निश्चित लाभ शिक्षकांना होईल. पुढे देखील वाचायला आवडेल.
ReplyDeleteखूप सुंदर लेख. याचा फायदा सर्व शिक्षक बांधवांना नक्की होईल.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteछान लेख..
ReplyDeleteलेख नेटका आहेच आणि योग्य वेळी आमच्या कडे पाठवला गेला त्याबद्दल धन्यवाद 🙏👍
ReplyDeleteखूप उपयुक्त माहिती मिळाली.
ReplyDeleteसरमाझे पण गेल्याच वर्षी बीएड झाले आहे,व मला तुमचे मत मनापासून आवडले. शैक्षणिकतंत्रज्ञान साहित्य कसे असायला हवे हे तुमच्या अनुभवातून म्हणजे दोन भिन्न विचारसरणी नुसार मेळ घालून करता येऊ शकते असा विश्वास आला. असेच अनुभव जर अजून share केले तर आपण आपलें शैक्षणिक साहित्य अजून उठावदार व दर्जेदार करू शकू कारण आम्हांला विविध व्यक्तींच्या साहित्य निर्मिती बाबत असलेल्या मागण्या व गरज या अनुभवांतून समजेल.
ReplyDeleteसांगली मनपा.- Manjusha suryawanshi
Revised lekh chhan ahe.
ReplyDeleteआशयघन व उपयुक्त लेखन , धन्यवाद सर
ReplyDelete