आसाममध्ये विवेकानंद केंद्राच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय शोध परीक्षेसाठी अभ्यास वर्ग घेण्यासाठी मी आणि अमर परांजपे दिब्रुगडला गेलो होतो. अभ्यास वर्ग संपल्यानंतर विवेकानंद केंद्राच्या अरुणाचल प्रदेशमधील जयरामपूर येथील शाळेत केंद्रीय बोर्डाने नव्याने आणलेल्या प्रॉब्लेम सॉल्व्हिंग असेसमेंट या विषयासाठी शिक्षक आणि मुलांसाठी कार्यशाळा घेण्यासाठी जयरामपूरला गेलो होतो.
जयरामपूरजवळ पांगसू पास आहे. पांगसू पास ही खिंड भारत आणि म्यानमार म्हणजेच ब्रह्मदेशाला जोडणारे सीमेवरचे ठिकाण आहे. भारत आणि म्यानमार याची सीमा निश्चित करणारा खुणेचा दगड या खिंडीच्या रस्त्यावर आहे. येथे एक विशेष आठवडी बाजार भरतो. बाजाराच्या दिवशी दोन्ही देशातील लोक परवाना काढून बाजारात येऊ शकतात आणि आपल्याला वस्तूंची खरेदी विक्री करू शकतात. शासनाने वस्तूंची एक यादी निश्चित केलेली आहे त्याची खरेदीविक्री होते. शेतमाल, भाजीपाला, स्थानिक कारागिरांच्या वस्तू देखील विक्रीसाठी असतात. सीमेपलीकडील लोकांना त्यांच्या देशातील मोठ्या बाजारात जायचे असेल तर काहीशे किलोमीटर प्रवास करावा लागतो, त्यापेक्षा त्यांना असा परवाना काढून भारतात येऊन खरेदी करणे सोयीचे जाते. सीमेच्या दोन्ही बाजूंना अनेक गावांमध्ये एकमेकांचे नातेवाईक आहेत त्यांना पण त्या निमित्ताने एकमेकांना भेटत येते.
आम्ही जाणार होतो त्या दिवशी बाजार नसल्याने आम्हाला परवाना मिळाला नाही. पण आलोच आहोत तर बाजार नाहीतर किमान तो सीमा स्तंभ बघावा म्हणून सकाळी लवकर उठलो आणि साडेचारच्या आसपास प्रवासाला सुरुवात केली. आपल्याला माहिती आहे की आपण जसजसे पूर्वेकडेजावे तसतसे लवकर उजाडते. अरुणाचलात उन्हाळ्यात सकाळी चारवाजता लख्ख उजाडलेले असते.
साधारण पाचसाडेपाच वाजले असतील पांगसू पासकडे जाताना वाटेतील नाम्पोंग लागले. ब्रह्मदेशाच्या सीमेजवळील हे शेवटचे मोठे गाव. गावातून जात असताना डाव्या बाजूला एक शाळा दिसली. सरकारी शाळा होती. सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर शाळेच्या व्हरांड्यात काही विद्यार्थी आणि एक शिक्षक योगासने करताना दिसली. शासकीय शाळेत एवढ्या सकाळी विद्यार्थी आणि शिक्षक काय करतात या उत्सुकतेपोटी गाडी थांबवली आणि मागेवळून शाळेत गेलो. शिक्षक आणि त्यांचे पंधरावीस विद्यार्थी योगासने करत होते. आम्हाला सुरुवातीला वाटले कुठल्यातरी स्वयंसेवी संस्थेचा कार्यकर्ता योगासने घेत असेल. सहज गप्पा माराव्यात म्हणून आम्ही शाळेच्या आवारात गेलो. आम्ही आल्याचे बघून त्या शिक्षकांनी त्यांचा योगासनाचा संच पूर्ण केला आणि आमच्याशी बोलण्यासाठी पुढे आले.
सिंगसर.... सिंगसर त्या शाळेत गणित-विज्ञानाचे अध्यापक. एवढ्या सकाळी मुलांबरोबर योगासने करत असल्याबद्दल त्यांचे सुरुवातीला अभिनंदन केले. मला तर सुरुवातीला हा योगदिन सिंड्रोम वाटलं. 😊
सिंगसर म्हणाले मी गेली काही वर्षे शाळेच्या जवळपास राहणारे जे विद्यार्थी सकाळी शाळेत येऊ शकतात त्यांच्याबरोबर नियमित योगासने करतो. सरांनी आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी काही योगासने करून दाखवली . सरांनी कोणताही आधार न घेता शीर्षासन, मयूरासन यासारखी अवघड आसने देखील करून दाखवली.
गप्पा मारताना सर म्हणाले गेली अनेक वर्ष मी घरी नियमित योगासनं करतो. पण एक दिवस असे वाटले की निसर्गतःच उत्तम शारीरिक कौशल्य असलेल्या या मुलांना मी गणित-विज्ञानाचे बरोबर योगासनेपण शिकवायला हवी. आपल्याला माहिती आहे की आज मणिपूर सारखे ईशान्य भारतातील छोटे राज्य खेळामध्ये भारतासाठी सर्वाधिक पदके मिळवते. हि कल्पना मनात येताच मी शाळेच्या मुख्याध्यापकांना योगासने शिकवण्यासाठी परवानगी मागितली. तर ते म्हणाले तुमचा विषय वेगळा, शारीरिक शिक्षणाचे शिक्षक बघून घेतील योगासनांचे काय करायचे. एकदोनदा मी रीतसर परवानगी काढायचा प्रयत्न केला. पण शाळेच्या रचनेत हे करता येणे अवघड आहे असे दिसल्यानंतर मी विचार केला की सगळ्या शाळेसाठी किंवा वर्गासाठी हे जमणार नसेल तर आपण शाळेच्या आसपास राहणाऱ्या विद्यार्थ्यांना सकाळी शाळेत बोलवू आणि घरी योगासने करण्याच्या ऐवजी शाळेच्या आवारात योगासने करू. इच्छा असणारे विद्यार्थी येतील.
'मुझे जो जो चीज अच्छी आती हैं वो मैं सिखाऊंगा'
म्हटलं तर बिहारमधून अरुणाचलातील एका दुर्गम भागातील शासकीय शाळेतील अध्यापक. पण त्याला आपल्या जवळ असलेले ज्ञान आणि कौशल्य ज्ञान मुलांपर्यंत पोहोचवण्याची इच्छा स्वस्थ बसू देत नव्हती अशी इच्छाच अध्यापकाची प्रेरणा आहे.
चांगला अध्यापक होण्यासाठी आपल्याला पाठपुस्तकापलीकडे जाऊन आपला विषय पोचवता आला पाहिजे. पण वर्गात आपण फक्त विषय शिक्षक म्हणून उभे नसतो एक व्यक्ती म्हणून आपल्या गुणदोषांसह उभे असतो. माझ्या व्यक्तिमत्त्वाचे विद्यार्थ्यांसमोर सर्वार्थाने प्रगटीकरण झाले पाहिजे हि इच्छा अध्यापकाची प्रेरणा आहे.
मला अनेक शिक्षक माहिती आहेत की ते उत्तम गायक असतात, वादक असतात, निवेदक असतात, छायाचित्रकार असतात पण शाळेत ते फक्त विषय शिक्षक असतात. असे कप्पे करून कसे राहता येत ?
ज्याला हे कप्पे जोडता येतात आणि आपल्या जवळ जे जे उत्तम आहे ते प्रकट करता येते त्याच्या बाबतीत दोन गोष्टी नक्की होतात एक आपल्या शिक्षकाला काहीतरी येते आणि आपले शिक्षक 'भारी' आहेत हा भाव विद्यार्थांच्या मनात तयार होतो. असा प्रभाव अध्यापकाची परिणामकारकता नक्कीच वाढवतो.
प्रशांत दिवेकर ,
ज्ञान प्रबोधीनी,पुणे
![]() |
अमर परांजपे यांच्या बरोबर पांगसू पास येथील सीमा स्तंभाजवळ |
अगदी खरे....
ReplyDeleteबोधप्रद...