आम्ही ठरवलंय .... आम्ही शिकवणार
दोन वर्षांपूर्वी मी, आशुतोष बारमुख ( आबादादा ) आणि प्रियव्रत देशपांडे मणिपूरला गेलो होतो. सीमावर्ती भागातील शाळांना भेटी देणे हा प्रवासाचा मुख्य हेतू होता.
एक दिवस दुपारी इंफाळपासून तास दीडतास प्रवास करून चारहजारे गावातील सनातन संस्कृत विद्यालयाला भेट दिली. चारहजारे गाव इंफाळ नदीच्या किनारी कुकी आणि नागा जनजातींच्या क्षेत्रात वसलेले आहे. कुकीबहूल क्षेत्रात असून सुद्धा या पंचक्रोशीतील गावांमध्ये नेपाळी लोकांची संख्या बरीच आहे. मणिपूरची कोणी एक राणी नेपाळची राजकन्या होती. तिच्याबरोबर आलेल्या लवाजम्यातील हे नेपाळी लोक. नेपाळी समाज कित्येक पिढ्या मणिपूर मध्ये स्थिरावला आहे.
आम्ही दुपारी उशिरा पोहोचलो होतो. शाळेची वेळ संपली होती पण आम्ही येणार आहोत असा निरोप पोहोचला असल्यामुळे शाळेचे प्रमुख शंकरजी खातिवडा आणि काही अध्यापक शाळेमध्ये आमची वाट पाहत थांबले होते. शाळेसमोर मैदान आहे, शाळा आटोपशीर आहे. शंकरजीनी शाळेची माहिती सांगायला सुरुवात केली. शंकरजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बरोबर सुमारे तासभर गप्पा मारल्या.
शंकरजींचे वडील श्री बद्रीनाथशरण खातिवडा हे या परिसरातील एक धर्मसुधारक आहेत. अंध असूनही त्यांनी वाराणसीला जाऊन वेदाध्ययन केले आहे. विद्याभ्यास पूर्ण झाल्यावर त्यांनी चारहजारेमध्ये धर्मोदय पाठशाळा सुरु केली. जातीभेद न पाळता, स्त्री-पुरुष भेद न मानता धर्मसंस्कार सर्वांसाठी यासाठी प्रबोधन करणे आणि धर्म जागरणाची चळवळ उभी करणे हे त्यांच्या कामाचे प्रमुख उद्दिष्ट . त्यांचे धर्म जागरणाचे काम हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे.
श्री बद्रीनाथशरण खातिवडा यांनी १९७८ साली सनातन संस्कृत विद्यालयाची स्थापना केली. परिसरातील लोकांना औपचारिक शालेय शिक्षणाबरोबर संस्कृत आणि संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी आणि संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी हे विद्यालय सुरू केले.ज्या क्षेत्रात आजही हिंदी भाषा सहजतेने बोलली जाता नाही त्या क्षेत्रात चाळीस वर्षांपूर्वी संस्कृत अध्यापन हे प्रधान उद्दिष्ट असलेली शाळा स्थापन करणे धाडसाचे काम !
शाळेचे वैशिष्ट्य सांगताना शंकरजी म्हणाले की आम्ही पहिलीपासून सर्व इयत्तातील विद्यार्थ्यांना संस्कृत शिकवतो. संस्कृत पाठांतर आणि संस्कृत संभाषण यासाठीचा त्यांनी एक स्वतंत्र अभ्यासक्रम तयार केला आहे व तो ते त्यांच्या शाळेत राबवतात. गप्पांमध्ये मी त्यांना प्रश्न विचारला की संस्कृतची ओळख करून देता हे उत्तम आहे पण त्यासाठी अध्यापक कुठून मिळतात. ( आज पुणे सोलापूर सारख्या शहरांमध्ये पण संस्कृत शिक्षक मिळणे अवघड गोष्ट आहे.) शंकरजी म्हणाले की संस्कृत पाठांतर आणि संभाषणाच्या अभ्यासक्रमासाठी आम्ही गावातील काही महिला आणि पुरुषांना प्रशिक्षण दिले आहे. ते त्यांच्या सवडीने येऊन संस्कृत अध्यापन करतात. औपचारिक संस्कृत विषय जेंव्हा अभ्यासक्रमात सुरू होतो तेंव्हा शाळेतील अध्यापक अध्यापन करतात. देशाच्या दुर्गम सीमावर्ती राज्यात गेली चाळीस वर्षे चालू असलेला हा प्रयत्न खरंच विशेष आहे.
शंकरजी सांगत होते की आमच्या प्रयत्नांमुळे आज मणिपूर बोर्डाने संस्कृत विषय ऐच्छिक विषय म्हणून शालान्त परीक्षेसाठी उपलब्ध करून दिला आहे. मणिपूर बोर्डासाठी संस्कृत विषयाची पाठ्य पुस्तके तयार करण्यात पण शंकरजीचा मोठा वाटा आहे. आज सनातन संस्कृत विद्यालयाच्या चाळीस वर्षांच्या प्रयत्नानंतर मणिपूरमध्ये संस्कृत औपचारिक विषय म्हणून अभ्यासक्रमात आला आहे.
मणिपूरमधील काही शाळांनी आता इयत्ता दहावीसाठी संस्कृत एक ऐच्छिक विषय म्हणून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिला आहे. संस्कृत विषयासाठी त्यांनी केलेल्या विशेष प्रयत्नाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. एका शाळेतील उपक्रम आज राज्याच्या शैक्षणिक योजनेत कसा सहभागी झाला या प्रयत्नाचा इतिहास माहीत करून घेतला.
गप्पांमध्ये सहज त्यांना एक प्रश्न विचारला आज काही शाळांनी संस्कृत हा विषय स्वीकारला आहे पण समजा या शाळांमधील काही तुकड्यांचे निकाल उत्तम लागले नाहीत तर गुणांच्या स्पर्धेच्या जगात या शाळा संस्कृत विषय मुलांना उपलब्ध करून देतील का ? आणि असा प्रतिसाद कमी होत गेला तर मणिपूर बोर्ड तरी विद्यार्थ्यांसाठी किती काळ हा विषय ऐच्छिक विषय म्हणून उपलब्ध करून देईल. दुर्दैवाने असे घडले तर तुम्ही काय कराल ?
शंकरजी म्हणाले, "हा प्रतिसाद वाढण्यासाठी प्रयत्न करत राहणे हे आमचं काम आहे पण जर दुर्दैवाने राज्यातील शाळांचा संस्कृतसाठीचा प्रतिसाद कमी झाला तर आम्ही संस्कृत शिकवायचे ठरवले आहे म्हणून आम्ही शिकवत राहू". 'हमने तय किया हैं सो हमारे स्कूल में हम सिखाते रहेंगे | '
खरंच
शाळेत काय शिकवायचे आणि का शिकवायचे हे कोणी ठरवायचे ?
शाळांनी आणि शिक्षकांनी ठरवायचे का आणखीन कोणीतरी ?
शाळेचे वैशिष्ट्यपूर्ण पूर्ण उपक्रम कोणी निर्माण करायचे आणि शाळेचे वेगळेपण कोणी जपायचे ?
मी इतिहास, भूगोल, गणित, विज्ञान, भाषा, कला इ. विषयांचे अध्यापन करताना कोणता शैक्षणिक अनुभव द्यायचा हे कोणी ठरवायचे ?
मी ठरवायचे
कि
फक्त कोणाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी मी अध्यापन करायचे ?
प्रशिक्षणाच्या निमित्ताने शिक्षकांशी गप्पा मारताना अनेकदा शिक्षक खंत व्यक्त करतात की
पूर्वी ती संकल्पना अभ्यासक्रमात होती आणि ती संकल्पना शिकवणे महत्त्वाचे आहे पण आता अभ्यासक्रमात नसल्यामुळे ... !!!!
..... या योजनेतील ... हा शैक्षणिक अनुभव खरंच उपयोगी होता पण आता ती योजनाच नसल्याने .....!!!
अनेकदा प्रबोधिनीतपण परिस्थितीतील बदलामुळे आणि बदलाच्या दबावामुळे
एखादी गोष्ट सुरु ठेवायची कि बंद करायची
असा प्रश्न निर्माण होतो
आपण जर आपल्या उद्दिष्टांबाबत स्पष्ट असू तर
शंकरजींचे वाक्य पुन्हा पुन्हा आठवत राहायचे
....
'हमने तय किया है तो हमारे स्कूल मे हम सिखाते रहेंगे'
आम्ही ठरवलय .... आम्ही शिकवणार
आम्ही ठरवलंय तर आम्ही करत राहू.... करत राहणारच !!!
प्रशांत दिवेकर
ज्ञान प्रबोधिनी, पुणे
सुंदर मांडणी. फोटो पण खूप छान! सातत्याने एखादी गोष्ट करत राहणे आणि ती सुद्धा स्वतः ठरवून हे खूप कठीण आहे. अशी उदाहरणे पोचवत राहा आमच्यापर्यंत.
ReplyDeleteफारच छान झालाय प्रशांत. तुझे असे अनेक अनुभव शब्दबद्ध करायला हवेस. सविता
ReplyDeleteमोजक्याच शब्दात व्यक्त झाल्याने आणि समर्पक अश्या शीर्षकामुळे लेख वाचनीय तर झाला त्या बरोबर सर्वच शिक्षकांकरिता प्रेरणादायी सुद्धा झाला आहे.
ReplyDeleteखूप मस्त अनुभव!
ReplyDeleteहा अनुभव म्हणून तर वेगळा आहेच..पण एक मोठं काम त्यामुळे समजलं...असं कुठे कुठे काय काय चांगलं चालू असेल आणि तुम्ही ते वेचलं असेल ते आमच्या पर्यंत जरूर पोचवत रहा.खूप छान लिखाण
ReplyDeleteकेल्याने होत आहे रे आदी केलेची पाहीजे ! खूपच छान .
ReplyDeleteसुंदर मांडणी केली आहे. खरोखर अध्यापक शंकरजी यांचे कार्य मोठे आहे. संस्कृत ही सर्व भाषांची जननी आहे आणि ती टिकलीच पाहिजे. मी सुद्धा मणिपूर येथे PSVP चे कार्यात मदत करत आहे. मुद्दाम या शाळेला भेट देवून आमच्या येथे कशी कार्यवाही करता येईल याचा नक्की विचार करीन.
ReplyDeleteसुंदर आणि माहितीपूर्ण लेख. शाळा भेटीची उत्सुकता वाढवली.
ReplyDelete