Skip to main content

तंत्रस्नेही अध्यापकत्व ५

तंत्रस्नेही अध्यापकत्व  ५

दहाबारा वर्षांपूर्वीची गोष्ट... शाळा सुटताना ईशानची आई शाळेच्या पायऱ्यांवर भेटली. साधारणत:  पालक जो सूर लावतात तो  सूर  होता ‘ सर, ईशानला सांगा, अभ्यास अजिबात करत नाही. सारखा कॉम्प्युटर गेम खेळत असतो.’ शाळा सुटण्याच्या गडबडीत असल्याने कोणता खेळ खेळतो विचारले आणि पुढील आठवड्यात सवडीने त्याच्याबरोबर एकत्र बोलू  असे ठरले. घरी गेल्यावर विचार केला ईशान खेळत असलेला आणि सध्या वर्गात पॉप्युलर असलेलाएजेस ऑफ एम्पायर’ आधी आपण खेळून बघू म्हणजे त्याबद्दल काय बोलायचे यावर विचार करता येईल आणि पुढचे आठ दिवस मी वेळ मिळेल तेव्हा मी फक्त आणि फक्त  'एजेस ऑफ एम्पायर' खेळ खेळत होतो.  ( महात्मा गांधीजींच्या कथेच्या उलट कथा आहे. ) आठ दिवसांनी ईशानची आई भेटली तेव्हा मी त्यांना सांगितले  की ईशानला खेळू नकोस असे सांगणे खरंच अवघड आहे.

अशा काय गोष्टी आहेत ज्यामुळे हे संगणकीय खेळ मुलांना गुंतवून ठेवतात?

१.      या खेळांचे काही नियम असतात.

२.      गुणदान पद्धती असते आणि ती यशाशी/ प्रगतीशी जोडलेली असते.

३.      इतरांबरोबर स्पर्धा असते.

४.      यश नोंदवले जाते.

५.      त्या यशापर्यंत पोहोचण्यासाठी खेळाडू स्वतःशी स्पर्धा करेल अशी खेळाची रचना असते.

६.      यशाचे आव्हानात्मक टप्पे मांडलेले असतात.

७.      प्रत्येक टप्प्यासाठी बक्षीस, पुरस्कार असतो.

८.      पदक तालिकेत त्याने स्थान मिळवणे साजरे केले जाते.

९.      खेळाडूंना एकमेकांबरोबर एका अदृश साखळीने बांधलेले असते. 

१०.    आणि यश मिळवण्यासाठी खेळाडूला काहीतरी व्यूहरचना ठरवावी लागते.

खरंतर कोणत्याही खेळाच्या रचनेत या गोष्टी असतात, पण या संगणकीय खेळात त्यांची मांडणी अशा आकर्षक पद्धतीने केलेली असते की त्या भूलभूलैयात खेळाडू हरवून जातो. आकर्षण आणि एकाग्रता याचा अनोखा संगम संगणकीय खेळात साधलेला असतो.

आज या तत्त्वांचा वापर करून विषय-अभ्यासाशी निगडीत अनेक संगणकीय खेळ उपलब्ध झाले आहेत. ते डाउनलोड करून खेळता येतात वा आंतरजालावर लाईव्ह खेळता येतात.

याच बरोबर विद्यार्थी जे खेळ आवडीने खेळतात त्यांच्या वापर अभ्यासासाठी करता येईल. पालकांच्या मोबाईलमध्ये असलेल्या अँपचा वापर करून काही खेळ, प्रश्नमंजूषा आणि कृतीपत्रिका तयार करता येतील. लेखाच्या सुरुवातीला ज्या खेळाचा उल्लेख केला त्या एजेस ऑफ एम्पायर’च्या अनुषंगाने मी वर्गात प्रश्नमंजूषा देखील घेतली आहे. एजेस ऑफ एम्पायर’ हा खेळ इतिहास, इंग्लिश, भूगोल शिकवण्यासाठी उत्तम साधन आहे. या खेळात खेळाडू होण्यासाठी प्रथम मानवी सभ्यता (सिविलायझेशन) निवडावे लागते. ब्रिटन, बायझेन्टाईन, जापनीज, मंगोल, तुर्क, वायकिंग असे पर्याय आहेत. या सभ्यतांचा कालखंड, त्यांची विशेषता, महत्त्वाची  गावं, नेते आदी माहिती गोळा करण्यास सांगता येईल. नन्तर नकाशाचा प्रकार निवडावा लागतो, सभ्यतेच्या विकासाचे टप्पे निवडावे लागता, मग विकासासाठीची संसाधने, सैन्यदलाचे प्रकार अशा अनेक गोष्टी खेळाच्या रचनेत आहेत. त्याबद्दल विद्यार्थ्याने जाणून घेतल्यास इतिहास , भूगोल, परिसर, इंग्लिश यांचा अभ्यास होईलच पण विद्यार्थी अधिक अर्थपूर्णतेने तो खेळ खेळतील.

याच बरोबर मोबाईलमध्ये असलेली गुगल मॅप, रेल्वे/ बस यांची वेळापत्रके याचा वापर करून अनेक कृतीकेंद्रित स्पर्धा तयार करता येतील. पालक ऑनलाईन वीजबिल भरत असतील त्या  अँपमधील माहितीचा वापर करून काही कार्यपत्रके तयार करता येतील. थोडी कल्पना ताणतो पण आज बाजारभाव, कृषिमाल भाव, शेअर मार्केट दर अशी व्यापाराची माहिती देण्याऱ्या वेबसाईट आहेत, अँप आहेत, त्यावर दर बघून १०० रुपये भांडवल वा काही वस्तू निवडून नफा-तोटा शिकण्यासाठी एक ‘नवा व्यापार खेळ’ तयार करता येईल. आजकाल काही  अँपमध्ये अभ्यास म्हणून डमी खेळाडू म्हणून खेळण्याची सोय असते. ती शैक्षणिक संधी म्हणून वापरता येईल. याप्रकारच्या शैक्षणिक कृती शोधून त्या आकारिक मूल्यमापनाच्या कृती/ प्रकल्प म्हणून विद्यार्थ्यांना देता येतील.  

आज अनेक शाळांमध्ये वेगवेगळ्या शैक्षणिक कंपन्यांनी तयार केलेली ई-लर्निंग सॉफ्टवेअर्स वापरली जातात. त्याचे डिझाईन करताना यातील अनेक तत्त्वांचा वापर केल्याचे लक्षात येईल. आकर्षकतेबरोबरच विद्यार्थ्याला शिकण्याच्या चक्रात ओढून घेण्याचे सामर्थ्य ई-लर्निंग सॉफ्टवेअरमध्ये आहे. कारण त्यांनी खेळाची मूलभूत तत्त्वे वापरून त्यांची रचना केली आहे.

आपला नेहमीचा वर्ग असो वा आत्ता करोनाच्या संकटकाळात आपण आभासी दूरस्थ वर्गात विद्यार्थ्यांबरोबर असू, आपण आपल्या अध्यापन पद्धतीत ही खेळाची तत्त्वे वापरू शकू का ?

        केलेल्या कामाची दखल आणि योग्यतेनुसार बक्षीस हा खेळाचा पहिला नियम आहे.

दोन उदाहरणे पाहू.

करोनाच्या लॉकडाऊनच्या काळात ज्ञान प्रबोधिनीच्या निगडी शाखेतील शिक्षक  रोजच्या अभ्यासासाठी वेगवेगळ्या शैक्षणिक कृती व्हाट्स अँपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत होते. विषय अभ्यासाच्या कृतीचे लेखी प्रतिसाद मुलांकडून मिळत होते. पण क्रीडा शिक्षणाचे काय ? क्रीडा शिक्षक रोज २० मिनिटांच्या व्यायामाची योजना करून पाठवत होते. पण जिथे निरीक्षणाखाली व्यायाम होणे अवघड, तिथे दूरस्थ सुचवल्यावर विद्यार्थी व्यायाम करतील हे कसे घडणार ? मग शिक्षकांनी सूर्यनमस्कार स्पर्धा जाहीर केली. त्यामुळे प्रतिसाद वाढला. एका शिक्षकांनी  तर व्यायाम करतानाचा एक फोटो पाठवा. ज्यांची आसनस्थिती उत्तम असेल अशा विद्यार्थ्यांचे फोटो मी माझ्या व्हाट्स अँप स्टेटसला डीपी म्हणून लावीन असे जाहीर केले आणि मग माझा फोटो सरांच्या डीपीवर असावा इर्षेतून विद्यार्थ्यांचा सहभाग वाढला. विद्यार्थ्यांच्यात हे मला करायचे आहे अशी प्रतीकात्मक स्पर्धा निर्माण झाली. कल्पना छोटीशीच आहे पण खेळाचे तत्त्वे वापरल्याने अनोखी ठरली.

आपल्यापैकी अनेकजणांनी खजिनाशोध खेळ खेळला असेल. यात मिळालेल्या सांकेतिक संदेशाची उकल करून अपेक्षित गोष्टीचा शोध घ्यायचा असतो. गेली काही वर्षे मी व्हाट्स अँपच्या माध्यमातून खजिनाशोध खेळ घेतो आहे. माझी शाळा पुण्याच्या सदाशिव पेठेत वसलेली आहे. शाळेच्या आसपास शिवकालापासून ते स्वातंत्रसंग्रामाशी निगडीत अनेक ऐतिहासिक ठिकाणे आहेत.  या 'सेल्फी विथ हिस्ट्री' खेळात विद्यार्थ्यांचे गट केले जातात. प्रत्येक गटात एक मोबाईल दिला जातो . व्हाट्स अँपवर गटाला सांकेतिक संदेश पाठवला जातो. त्याची उकल करून त्यांनी ते ठिकाण शोधायचे, त्या ठिकाणाला भेट देऊन गटाने ते ठिकाण दिसेल अशी सेल्फी काढायची, त्या ठिकाणाच्या  ऐतिहासिक आणि सद्य स्थितीबद्दल  माहिती मिळवायची.  माहिती आणि सेल्फी पाठवल्यावर पुढील संदेश पाठवला जातो. तंत्रज्ञानाचा वापर केल्याने पारंपरिक खेळ अधिक रंजक झाला. असे अनेक सेल्फी विथ एनर्जी सोर्सेस , सेल्फी विथ मोशन , सेल्फी विथ लाइफ डिझाईन करता येतील . आपल्या परिसरातील वनस्पती, शाळेच्या आवारातील वनस्पतीचा परिचय करून देण्यासाठी सेल्फी विथ प्लांट्स हा खेळ घेता येईल. सेल्फी हि क्रेझ आहे त्याला शैक्षणिक मूल्य जोडायचे .

तंत्रस्नेही शिक्षकाने असे खेळ शोधून, तयार करून त्यांची अभ्यासक्रमाशी आणि सरावाशी योग्य सांगड घातली पाहिजे . शिक्षणप्रक्रियेत  हे खेळ प्रभावी पद्धतीने वापरता येतील. कारण यात चुका करण्याचे स्वातंत्र्य आहे, परत खेळताना नवीन पद्धतीने उत्तराकडे जाण्यासाठी बदल करण्याचे स्वातंत्र्य आहे आणि मुख्य म्हणजे अशा खेळाच्या तत्त्वांवर तयार केलेल्या शैक्षणिक कृतीत कोणी शिकवणारा नसतो. शिकणाऱ्याला अर्थात खेळणाऱ्याला काहीतरी सध्या करायचे असल्याने तो खेळत राहतो आणि हा साध्या करण्याचा आनंदच त्याला पुढेपुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देतो.

                                                                            प्रशांत दिवेकर

                                                                            ज्ञान प्रबोधिनी, पुणे


Comments

  1. 👍👍👍👍 धन्यवाद 🙏

    ReplyDelete
  2. खूपच सुंदर सर,
    असा विचार केला नव्हता
    मुलांना काय द्यावं ह्या विचाराने सुन्न व्हायला होतं
    धन्यवाद ,����
    डोंबिवलीत आम्ही गटावर मुलांना काही टास्क देतो पण खूप
    प्रतिसाद येत नाही नियमित मुले च रिपल्य देतात
    सगळ्यांना जोडून घेण्यासाठी ह्या सगळ्याच विचार करून टास्क द्यावी लागेल

    ReplyDelete
  3. Thought provoking article sir. Creatively designed.

    ReplyDelete
  4. अनुकरणीय अशा कल्पना आहेत प्रशांत जी

    ReplyDelete
  5. छान च लेख! सर तुमचा सखोल अभ्यास खरचं अनुकरणीय आहे.आपणांसारखे अचूक मार्गदर्शन करणारे व्याख्याते लाभले,या मूळें माझेही अनुभव समृद्ध होतील यात शंकाच नाही!
    मुलं मोबाईल वर गेम कां खेळतात याचा तुमचा सखोल अभ्यास व त्यावर अचूक रामबाण उपाय ही बाब आवडली.
    सर मी जेव्हा गूगल quiz बनवले तेव्हा मला काही दिवस असाच कमी प्रतिसाद मिळत होता, पण मी यावर एक युक्ती केली, मी ही quiz सोडवली तर मुलांच्या फोन वर mail द्वारे लगेच तात्काळ प्रमाणपत्र मिळेल अशी व्यव्स्ट केली. मुलांचा प्रतिसाद वाढला. पण काही दिवसांनी पुन्हा प्रतिसाद मंदावला... मला कळले की तेच ते व फारच औपचारिक प्रमाणपत्र मुलांना कंटाळवाणे झाले असेल... मी मग या प्रमाणपत्र चे रुपडे च पालटून टाकले! मी मुलांना whts app वर त्यांचे आवडते cartoon कोणती ही माहिती घेतली, आणि मग रोज च प्रत्येक quiz साठी खूपच आकर्षक असे कार्टून असलेली प्रमाणपत्रे पाठवू लागली.मात्र आता या मधे मी टक्केवारी ची अट लागू केली, जी मुलं किमान 80%मिळवतील त्यांनाच ही आकर्षक प्रमाणपत्र जाऊ लागली, ती मुलं मग अति हर्षाने ती गृप वर दुसर्यांना दाखवण्यासाठी पाठवू लागली.. याला मिळाले, मग मी पण जर दिलेली अट पूर्ण केली तर माझे नाव असलेले डिजिटल आकर्षक असे प्रमाणपत्र मला मिळेल असे अनेक मुलांना वाटले असावे व सुरुवातीला कमी असलेला व नंतर मंदावलैला प्रतिसाद शेवट पर्यंत व अजूनही भरभरून येत च आहे.
    आपण सांगितलेला क्रीडा शिक्षकांचा अनुभव तर जाम भारी वाटला सर. या लेखा मुळे अजून खूप काही नाविन्य व कल्पक मी करू शकेन असे वाटते.
    आपलें अनुभव अजून वाचायला मिळावेत.

    ReplyDelete
  6. सौ.मनिषा थोरात सांगली मनपाJune 29, 2020 at 1:39 AM

    नेहमीप्रमाणे हा ही अनुभव उत्तम.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

विद्यार्थी + व्रतार्थी = विद्याव्रती

विद्यार्थी + व्रतार्थी = विद्याव्रती                       जुलै महिन्यात झारखंडला जमशेदपूर जवळ घाटशिला गावी शिक्षक प्रशिक्षणासाठी गेलो होतो. पूर्वीसिंघभूम जिल्हयात आर्ट ऑफ लिव्हिंग मार्फत श्री श्री विदया मंदिर नावाने संथाळ आदिवासी भागात या शाळा चालवल्या जातात. टाटानगर पासून  ३-४ तासाच्या अंतरावर असून देखील विकास नाही. नक्षलवादाचा प्रभाव असलेल्या भागात या शाळा स्वयंसेवी वृत्तीने चालवल्या जातात. शाळेला सरकारी अनुदान  नाही तरीही  मोफत शिक्षण आणि मोफत पोषक आहार दिला जातो . शाळेत कुपोषित विद्यार्थी नाहीत  आणि जवळपासच्या सरकारी शाळांचा विचार करता श्री श्री विदया मंदिर शाळेत शैक्षणिक गळती ० %. हे गेल्या दहा वर्षांच्या प्रयत्नातून सध्या झाले आहे. आता या शाळा माध्यमिक टप्प्यापर्यंत पोचल्या आहेत. गुणवत्तापूर्ण शालेय शिक्षणाबरोबर तंत्र शिक्षण देऊन गावात राहण्यासाठी विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवणे हे शाळेचे पुढचे उद्दिष्ट आहे. ज्ञान प्रबोधिनी त्यांच्या या प्रयत्नात शिक्षक प्रशिक्षक म्हणून काम करते आहे.     ...

सत्यं च स्वाध्यायप्रवचने च।

  सत्यं च स्वाध्यायप्रवचने च। प्रकृति के सानिध्य में रहकर उसके साथ एकत्व का अनुभव करना , स्वाध्याय का प्रथम सूत्र है , जो हमें ब्रह्मांड के निर्माण और उसके रहस्यों को जानने की प्रेरणा देता है। जड़-चेतन धारणाओं से जुड़ी मूलकण , वंशसूत्र , गुणसूत्र जैसी सूक्ष्मतम चीज़ों के अध्ययन से लेकर ब्रह्मांड के विस्तार के अध्ययन तक का व्यापक आयाम हमें प्रकृति के गहनतम रहस्यों में प्रवेश करने का मार्ग प्रदान करता हैं। ब्रह्मांड के विशाल विस्तार और उसकी अनंतता को समझने का प्रयास करने के लिए पहला उपनिषदिक अध्ययन सूत्र है "ऋतं च स्वाध्याय प्रवचने च।" ऋतम् का अध्ययन ब्रह्मांड के नियमों और संरचनात्मक सिद्धांतों को समझने की कुंजी है। ऋतम् का अध्ययन   केवल दार्शनिक धारणा नहीं है , बल्कि यह ब्रह्मांड की रचना और उसके संचालन में निहित नियमों को   वैज्ञानिक दृष्टिकोणद्वारा गहराई से समझना है। यह हमें   सिखाता है कि ब्रह्मांड किस प्रकार संतुलित और सुव्यवस्थित रूप से कार्य करता है। ऋतम् का स्वाध्याय करते समय हम अपने परिवेश को गहराई से समझने लगते हैं। प्रकृति के रहस्यों की खोज और उन...

सहपुस्तक चाचणी

  सहपुस्तक चाचणी                मार्च महिन्यात शालांत परीक्षा सुरु झाल्यावर वर्तमानपत्रे ; दूरचित्रवाणीवर दहावी , बारावीच्या परीक्षेत चालू असलेल्या कॉपी पुरवठ्याची छायाचित्रे , बातम्या , चित्रफिती दिसू लागतात. माध्यमात चर्चा सुरु होते आणि आपण कशासाठी शिकवतो ? असा प्रश्न पडतो. त्याला प्रतिसाद म्हणून कॉपी मुक्ती अभियान सुरु केले जाते आणि हळूहळू त्याचाच अभिमान वाटायला लागतो. परीक्षा कशासाठी... ? वर्गात शिक्षक पुस्तकातील पाठ वाचून दाखवतात , स्पष्टीकरण म्हणून वाक्य बोलीभाषेत रुपांतर करून मांडतात , पाठाचा सारांश सांगतात. परीक्षेत पाठाखालील सरावासाठी दिलेलेच प्रश्न विचारतात. पाठाखालच्या सरावातील प्रश्नच विचारायचे असतील तर परीक्षा कशासाठी... ?              माझे एक मित्र वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. गप्पा मारताना ते मला म्हणाले , ' अमुक सालानंतर डॉक्टर झालेल्यांकडून उपचार करून घेऊ नका. ' मी विचारले , का ? काय झाले ? म्हणाले - "त्यावर्षी मला पहिल्या...