( युवा सकाळ पूर्वांचल मैत्री अभियान : साद ईशान्य भारताची लेखमालेत प्रकाशित झालेला लेख )
मिझोराम
मिझोराम
म्हणजे निसर्गसौंदर्याची मुक्त हस्ते केलेली उधळण! थंड वातावरण,
घनदाट हिरवीगार जंगले, बांबू बनांच्या दुलया
पांघरलेल्या लुशाई टेकड्या आणि ह्या लुशाई रांगात नांदते राज्य मिझोराम. खरंतर,
मिझोरम 'मि' म्हणजे माणूस, 'झो' म्हणजे डोंगर आणि 'रम'
म्हणजे भूमी. अर्थात डोंगरात राहणारा माणूस.
२१,००० चौ. किमी. क्षेत्रफळ असलेल्या मिझोरामच्या पूर्वेस व पश्चिमेस
म्यानमार व बांग्लादेश सीमा आहेत. उत्तरेस आसामचा कचार जिल्हा तर ईशान्येला मणिपूर
आहे. मिझोरामची राजधानी आयझॉलला पोहोचण्यासाठी गुवाहाटीहून सिल्चरमार्गे प्रवास
केला. सिल्चरला आमच्या गटाला संजय कानडे भेटले. मूळचे महाराष्ट्रातले संजयजी
वनवासी कल्याण आश्रमाचे कार्यकर्ते आहेत. गेली सहा वर्षे मिझोराममध्ये आहेत.
संजयजींकडून
मिझोरामची वैशिष्ट्ये माहिती करून घेत आम्ही सिल्चरहून आयझॉलच्या दिशेने प्रवास
करत होतो. वाटेत मिझोरामच्या सीमेवर मिझो पोलिस, एक्साईज, मिझो स्टुडंट युनियनने आमची 'इनर लाईन परमिट' तपासली. ईशान्य भारतात अरुणाचल
प्रदेश, नागालँड व मिझोराममध्ये प्रवेश करण्यासाठी परवाना
काढावा लागतो. मिझोरामसाठी फोटो परवाना मिळतो व तो परवाना मिळवण्यासाठी स्थानिक
मिझो रहिवाश्यांची शिफारस लागते. आपल्याच देशातील एका राज्यात प्रवेश करण्यासाठी
परवानगी लागते. ही गोष्ट आमच्यासाठी खटकणारीच होती. परवानगी तपासणीसांच्या
अविश्वासक नजरा मिझोराममधील मैत्री अभियानाची खडतरता स्पष्ट दाखवत होत्या.
आयझॉलमध्ये
संजयजींनी आमची व्यवस्था स्थानिक कुटुंबात केली होती. मिझोंशी संवाद साधताना पहिली
अडचण भाषेची आली. मिझो भाषेशिवाय भाषा समजत नाही. त्यामुळे 'आता काय बोलायचं?' हा मोठा प्रश्न घराघरात गेल्यावर
आमच्यासमोर होता. पण नंतर त्यांचे पोशाख, दागिने, उत्सवांची छायाचित्रे, नृत्य पाहताना, समजून घेताना हळूहळू मैत्री वाढत गेली व भाषेची अडचण जाणवेनाशी झाली.
मिझोराममध्ये
मिझो,
रियांग, चकमा, लुशाई,
हमार ह्या प्रमुख जनजाती आहेत. १८९४ साली ब्रिटीश मिशनरी जे. एम्.
लॉरेन व रेव्हरंड एफ. डब्ल्यू. सॅव्हिदगे ह्यांनी ख्रिस्ती धर्मप्रसाराला सुरुवात
केली. आज ९५ % मिझो धर्मांतरीत ख्रिश्चन आहेत. शिक्षण व आरोग्य क्षेत्रात मोठे
सेवाकार्य उभे आहे. त्याचा एक परिणाम म्हणून आज मिझोराममध्ये साक्षरतेचे प्रमाण
जास्त आहे. ब्रिटीशांच्या काळात मिझोराम 'लुशाई हिल्स
डिस्ट्रीक्ट' म्हणून ओळखला जाई. हा मूळात बऱ्याक खोऱ्याचा
असणारा भाग आसाम राज्याचा भाग होता. त्या काळात ब्रिटिशांनी मिझोराम राज्यात सत्ता
स्थापन केली. परंतु प्रत्यक्ष कारभार मात्र स्वतः कमीत कमी हस्तक्षेप करून,
स्थानिक मिझो लोकांमार्फत चालविला. स्वातंत्र्योत्तर काळात प्रारंभी
मिझोराम आसामचा भाग होता. १९७१ मध्ये आसामपासून वेगळा झाल्यावर मिझोरामला
केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाला व नंतर त्याचे भारताच्या तेविसाव्या राज्यात
रुपांतर झाले. दुर्लक्षिततेच्या काळात मिझोराममधील बंडखोरी वाढून, 'मिझो राष्ट्रीय आघाडी' ही विभाजनवादी संघटना उघड
अतिरेकी कारवाया करत असे. परंतु १९८६ मधे केंद्र सरकार व मिझो राष्ट्रीय आघाडीचे
प्रमुख लाल डेंगा ह्यांच्यात झालेल्या शांतता करारानंतर परिस्थिती पूर्ववत झाली.
आयझॉलमध्ये
हिंडताना तेथील युवा गटाशी संवाद साधताना त्यांच्यावरचा पाश्चिमात्य प्रभाव
प्रकर्षाने जाणवत होता. जुन्या प्रथा, परंपरा,
सण पूर्णपणे लोप पावले आहेत. संगीत, नृत्य,
पोशाख पारंपारीक वैविध्य, वैशिष्ट्य हरवत
चाललले आहे. बराचसा युवक गट ड्रग्ज इ. व्यसनांच्या आहारी गेला आहेत. मिझोराममध्ये
राहणारे हे सर्व मंगोलियन वंशाचे लोक १५० ते २०० वर्षापूर्वीच आंतरराष्ट्रीय
सिमावर्ती प्रदेशातून ह्या भागात स्थलांतरित झाले आहेत. पूर्वीच्या काळी हे सर्व
लोक 'पथियान' (Pathian) ह्या दैवी
शक्तिची उपासना करत असत. 'रामहुआई' (Ramhuai) नावाची दुष्ट शक्ती गावात असल्याने गावाचे नुकसान होते असा समज असल्याचे
संदर्भ मिझो इतिहासात सापडतात. गावातील जी व्यक्ति अजस्त्र व रानटी प्राण्यांपासून
गावातील लोकांचे रक्षण करते त्याच व्यक्तिला 'पियालराल'
(pialral) म्हणजे स्वर्गात स्थान आहे असे ह्यांचे मानणे होते.
परंतु कालांतरानुसार ह्या जुन्या विश्वासाची आणि
रितीरिवाजांची जागा नवीन विचारांनी घेतली. पारंपारिक समाजरचनेत गावोगावी 'झोलबुक' होती, ज्यापैकी काही
अजूनही अस्तित्वात आहेत. झोलबुकमध्ये गावातील वरिष्ठ मंडळी, मिझो
युवक-युवतींना समाजात जबाबदार व्यक्ति म्हणून कसे वागावे, आचार-विचार
कसे असावेत ह्याबद्दल मार्गदर्शन करतात. ही संकल्पना आम्हांला खूपच छान वाटली.
ह्यामुळे युवागट चुकीच्या मार्गाला जाण्याची शक्यता कमी अजूनही खूप आतल्या गावात
संपूर्ण गाव मिळून विकासांची कामे करतात, एकत्र सण उत्सव
साजरे करतात. ह्या लोकांचे सर्व सण-उत्सव शेतीशी, निसर्गाशी,
बदलणान्या ऋतुंशी संबंधित आहेत. मिमकुट, चापचरकुट,
पॉलकुट हे त्यांचे काही उत्सव आणि चेरो, खुल्लम,
चाई लाम, राल्लु लाम हे त्यांचे नृत्यप्रकार !
त्यांपैकी चेरो हे बांबूनृत्य खूप प्रसिद्ध आहे ! अशा ह्या रंगीबेरंगी
नृत्य-नाट्य-गायन-वादनाने परिपूर्ण आणि नवीन जुन्या विचारांनी मिश्रित संस्कृतीचा
वारसा मिझोरामला आहे.
आयझॉलमध्ये
आम्ही मिझो स्वधर्म मानणाऱ्या 'मुन्नालाल
चुंखुआ' ह्या स्वधर्म संघटनेच्या कार्यकर्त्यांना भेटलो.
पारंपारिक मिझो धर्माचे संघटन व्हावे ह्यासाठी स्वधर्म संघटनेचे कार्यकर्ते
पारंपारिक पूजा, गाणी, नृत्य प्रार्थना
ह्यांचे डॉक्यूमेंटेशन करत आहे. त्यांनी शाळा व वसतीगृहे सुरु केली आहेत. ह्या
गटावर ख्रिश्चन मिझो गटाचा मोठा सांस्कृतिक रेटा आहे. ह्या संदर्भात नुन्नाला
चुंखुआचे सदस्य पु. खोवेलथांगा म्हणाले, "हमारे बच्चों
को पढ़ने के लिये ख्रिश्चन स्कूल ही है ! बाद में वो खिश्चन बन जाये तो क्या फायदा?"
त्यांच्याशी बोलताना ह्या छोट्या गटाची अस्तित्व टिकवण्यासाठी चाललेली
दाहक लढाई व प्रश्नाचे गांभिर्य लक्षात येत होते. आयझॉलमध्ये रविवारी सकाळी आम्ही
नुन्नालाल चुंखुआ' च्या प्रार्थना सभेत सहभागी झालो.
प्रार्थनेनंतर धर्मगुरुंनी आशिर्वाद दिला व सत्कार केला. त्यांनी मैत्री अभियानाचे
स्वागत केले. दुपारी स्वधर्म संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या भावाचे निधन झाल्याने
त्यांच्या दुखवटा शोकपूजेत सहभागी झालो.
ह्या
मिझो रेट्यापुढे बळ कमी पडल्यानेच रियांग जमातीच्या लोकांची मिझोराम बाहेर
हकालपट्टी करण्यात आली. आज स्वतंत्र भारतात रियांग लोकांना त्रिपुरामध्ये
निर्वासीत म्हणून जीवन व्यतीत करावे लागत आहे. अशा विविध प्रश्नांचा परिचय करून
घेत आम्ही आयझॉल जवळ ४० कि.मी. अंतरावरील थिंगसुलचिया गावी ललटनम् स्कूलमध्ये
मैत्री शिबिरासाठी दाखल झालो. शिबिरात विद्यार्थ्यांना खेळ,
हस्त-कौशल्य, वारली चित्रकला, विज्ञान प्रयोग, हिंदी गाणी, 'चिऊ
काऊ माऊ' हे मराठी बडबडगीत शिकविले. त्यांच्याकडून मिझो गाणी,
नृत्य शिकण्याचा प्रयत्न केला. मुलांशी छान मैत्री झाली.
थिंगसुलतियाहून
परत येताना आम्ही बाखक्तोमला भेट दिली. मिझोराममध्ये काही जनजाती आपले मूळ ज्यू
/इस्त्राइलशी जोडतात. ते ओल्डटेस्टमेंट मानतात. बाखक्तोमला एका विशेष कुटुंबाला
भेट दिली. तेथे गावातील राजाच्या मोठ्या कुटुंबाला भेटलो. राजाला फक्त पंचवीस-तीस राण्या व शेसव्वाशे मुले होती. अगदीच लेकुरवाळे घर होते. घराचे
स्वयंपाकघर तर विशेष होते.
मिझोराममधील
एक उंच शिखर 'रियाक पिक' ला आम्ही एक दिवस ट्रेकिंगसाठी गेलो होतो. वाटेत आम्हाला युवकांचा गट
भेटला त्यातील काही जण आम्हांला पाहिल्यावर 'आईवा', 'डखार' अशा आरोळ्या द्यायला लागले. स्थानिक मिझो
मार्गदर्शकांनी त्याचा अर्थ 'परदेशी भारतीय' असा सांगितला. आमच्यासाठी ही घटना अनपेक्षित होती, मिझोरामची
भारताशी नाळ जोडण्यासाठी अजून भरपूर प्रयत्न करण्याची असलेली गरज ह्याची जाण करून
देणारी होती. मैत्री अभियानात निर्माण झालेले बंधच हे अंतर कमी करतील. तरच एकात्म
भारताचे स्वप्न साकार होईल.
-
प्रशांत दिवेकर
ज्ञान
प्रबोधिनी, पुणे
( युवा सकाळमध्ये प्रकाशित )
Comments
Post a Comment