परवा सहज जुन्या वह्या, कागदपत्रे पाहात असताना एक जुने सहलवृत्त सापडले. दहा वर्षांपूर्वीच्या आमच्या सहलीच्या वेळी केलेल्या डायरीतील नोंदी चाळता चाळता मन आठवणीत मागे गेले.
मे महिन्यातील दहावीचे जादा तास चालू झाले. तेव्हा, एके दिवशी रत्नागिरीच्या 'गोगटे जोगळेकर महाविद्यालया' चे प्रा. सुरेंद्र ठाकूरदेसाई यांचा 'कोकणातील भौगोलिक वैशिष्ट्ये' या विषयावर स्लाईड शो होता. स्लाईड शोनंतरच्या प्रश्नोत्तर व गप्पांत पाठ्यपुस्तकात अभ्यासलेली समुद्र, खाडी,पुळण आदी भौगोलिक वैशिष्ट्ये, जी सरांनी स्लाईडमधून दाखवली होती ती पाहण्यासाठी सुरेंद्र सरांबरोबर कोकण अभ्यास सहलीला जायचे ठरवले. 'सहलीची तयारी तुमची तुम्ही करणार असाल तर सहलीला परवानगी आहे', असे प्राचार्यांनी सांगितले.
मग काय, रोज सहलीविषयीच चर्चा! किती दिवस जायचे? केव्हा? कोणत्या मार्गाने ? बरोबर काय काय न्यायचे? खर्च किती ? मुक्काम कुठे करायचा? असे अनेक प्रश्न निर्माण झाले. शेवटी एक बैठक घेऊन कामांच्या यादया केल्या व गट करून कामे वाटून दिली. संपर्काचे फोन करणे, भेटींच्या वेळा ठरवणे इ. ट्रॅव्हल एजंटना भेटून कमी दरात चांगली गाडी कोणाकडे मिळेल, यासाठी हेलपाटे घालून बस ठरवली. सर्व उरकता उरकता सहलीचा दिवस जवळ येत होता.
पहिल्या दिवशी ताम्हिणी घाटातून कोकणात उतरताना वाटेत ताम्हिणीचे सुंदर जंगल लागले. या घाटात एक प्रचंड घळई (गॉर्ज) आहे. घाट उतरत असताना सह्याद्री पर्वतरांगा, लाव्हाचा थर, खडकांचे विविध प्रकार पाहायला मिळाले.
कुडावळ्याला जाताना वाटेत सावित्री नदीची खाडी व मंडणगडचे पर्वतांतर्गत पठार लागले. कुडावळे येथे निसर्ग अभ्यासक दिलीप कुलकर्णी यांच्याबरोबर त्यांच्या घराजवळ असलेली देवराई पाहिली. निसर्ग संवर्धन व पर्यावरण समस्यांवर त्यांच्याशी झालेल्या गप्पांमुळे मजा आली. देवराईत निटम (अनावृत्तबीजी वनस्पती), हिरडा, बेहडा, सावर, कुडा, ऑर्किड, नेचे, दगडफूल, ब्राकेट फंगस यांसारख्या विविध वनस्पती, प्रचंड वेली पाहता आल्या. जंगल परिसंस्थेची ओळख झाली. वाटेत आम्ही पन्हाळे (काजी) येथील प्राचीन लेणी पाहण्यास गेलो, तो एक लेण्यांचा समूह आहे व त्यावर बौद्ध पंथ, नाथ पंथ, गणेश पंथ आदींचा प्रभाव जाणवतो. दापोली येथील श्री. विष्णू सोमण यांच्यासोबत लेण्यांचे वास्तुशास्त्र अभ्यासण्यात, लेण्यातील विविध शिल्पांत कोरलेले महाभारत, रामायण आदीतले प्रसंग ओळखण्यात आम्ही रंगून गेलो होतो.
या लेण्यांजवळून कोटजाई नदी वाहते. तिच्या काठाने हिंडताना नदीच्या अवस्था, खनन, संचयन कार्य आदींचा अभ्यास करता आला.
रात्री विश्रांतीपूर्वी दिवसभरात पाहिलेल्या गोष्टींची उजळणी, टिपणे / नोंदी, नकाशे, रेखाटने पूर्ण करणे, गोळा केलेले नमुने योग्य प्रकारे साठविणे आदी कामे तितक्याच उत्साहात केली.
दुसऱ्या दिवशी पानवळ येथील कोकण रेल्वेचा पूल पाहिला. आधुनिक वास्तुशास्त्राचा हा अप्रतिम नमुना आहे. गाडी जाताना पूल हादरताना अनुभवले आणि भौतिकशास्त्रातील नियम पहिल्यांदाच समजला. नंतर वाटेत लोटे परशुराम येथील मंदिर पाहिले. वाटेत वासिष्ठी नदीची खाडी लागली. खारफुटी वनस्पती, भरती-ओहोटीचा खाडीवर होणारा परिणाम आदी गोष्टींची माहिती झाली. गणेशगुळ्याच्या पुळणीवर हिंडताना किनाऱ्यांचे प्रकार, समुद्रकडा, तरंगघर्षित मंच, लाटा, समुद्राचे संचयन, विविध समुद्री प्राणी व वनस्पती इ. गोष्टी पाहिल्या.
सकाळी लवकर उठून खास कोकणात असतात अशा देवळात उपासना केली व नंतर नारळी, पोफळी, आंबा, मिरी, लवंग, दालचिनी, जाम, रातांबा आदी वनस्पती पाहिल्या. रत्नागिरी येथे रत्नदुर्ग येथील सागरी गुहा पाहिली. रत्नागिरीच्या पुळणीवरून हिंडताना समुद्रामुळे होणारी धूप रोखण्यासाठी मानवाने केलेले विविध प्रयत्न समुद्राने कसे विफल केले हे जाणवत होते.
नंतर आम्ही लावगण येथील बंदर पाहण्यास गेलो. बंदरात नांगरलेल्या मोठ्या बोटीवर छोट्या होडीतून जाऊन दोराच्या शिडीच्या साहाय्याने बोटीवर चढलो. बोटीवर इंजिन रूम, , डेक, रडार यंत्रणा आदी गोष्टी बघितल्या. नंतर लावगण बंदराच्या निर्मितीसाठी झटणारे व्यवस्थापनप्रमुख श्री. दिलीप भटकर यांच्याशी झालेल्या गप्पांतून आम्हाला एका ध्येयवेड्या व्यक्तीचा परिचय झाला. लावगण हे एक खाजगी बंदर असून या बंदराचे एक वैशिष्ट्य म्हणजे हे भारतातील एकमेव बंदर आहे की जेथे मुलीदेखील जहाज दुरुस्तीचे काम करतात.
सहल संपवून पुण्यात आल्यावर आमचा पुढचा आठवडा सहलीचा अहवाल लिहिणे, अध्यापक, वर्गमैत्रिणींसमोर सहलीचे फोटो दाखवून माहिती सांगणे यात कसा संपला, हे कळलेच नाही. खरंच, या तीन दिवसांच्या सहलीत नियोजन कसे करायचे, निसर्गात हिंडत असताना कोणत्या गोष्टी बघायच्या, कशा बघायच्या, नोंदी कशा ठेवायच्या आदी गोष्टींची तोंडओळख झाली.
आजही एखादया सहलीचं नियोजन करताना या गोष्टी नकळत उपयोगी पडतात.
प्रशांत दिवेकर
ज्ञान प्रबोधिनी, पुणे
प्रशिक्षक एप्रिल २००२ मध्ये प्रकाशित (अपरांत अभ्यास सहल )
Comments
Post a Comment