संग्रहालय : एक समाज शिक्षण केंद्र
संग्रहालय, कलादालन या समाज शिक्षणासाठी निर्माण झालेल्या रचना आहेत. याठिकाणी संग्रह करणाऱ्याचे शिक्षण तर होतेच पण त्याबरोबर संग्रह व प्रदर्शन पाहायला येणार्या व्यक्तीच्या माहितीत भर घालण्याचे व व्यक्तीची दृष्टी व्यापक करण्याचे कार्य कळत-नकळत होत असते. संग्रहालय हे समाज शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र आहे. कलादालनात एका विशिष्ट विषयावर तात्पुरत्या स्वरूपात प्रदर्शनीय संग्रहवस्तूंची मांडणी केलेली असते तर संग्रहालयात ही मांडणी रचनाबद्ध आणि कायमची असते.
कौटुंबिक सहली असोत वा शालेय सहली असोत,सहलीच्या कार्यक्रमात एखाद्या संग्रहालयाला भेट देण्याची योजना असतेच. संग्रहालये ही राष्ट्रीय वारसा जपणारी ठाणी आहेत. संग्रहालयात मानवी इतिहास व संस्कृतीच्या खुणा सांगणाऱ्या वस्तू असतातच पण या खुणा शोधणारे, गोळा करणारे व त्याचा अभ्यास करणारे अभ्यासक पण असतात. खरे तर संग्रहालय हे मुक्त शिक्षणाचे सर्वोत्तम ठिकाण आहे. याठिकाणी प्रवेश करण्यासाठी कोणतीही शिक्षणाची, वयाची अट नसते. संग्रहालयात व्यक्ती मुक्तपणे त्याला हवा तेवढा वेळ घेत वस्तू पाहात, माहिती वाचत फिरू शकते. संग्रह पाहताना पाहणारा माहितीने समृद्ध होतोच पण त्याबरोबरच संग्रहालयातून फिरताना जो विचार होतो, जे चिंतन होते त्यामुळे पाहणारा ज्ञान,विचार आणि भावनांनी समृद्ध होतो.
संग्रहालयाचे प्रकार :
१. इतिहास संग्रहालय :
इतिहासाशी निगडीत संग्रहालय पाहताना व्यक्ती, वस्तू, ठिकाणे यांचा परिचय करून घेत आपण घटनांचा अभ्यास करतो. वस्तू, हत्यारे, कागदपत्रे पाहात मानवी संस्कृती, राजेरजवाडे यांचा भूतकाळातील प्रवास आपण माहीत करून घेतो.
२. उत्क्रांती इतिहास संग्रहालय :
खडक , स्फटिक, मासे, पक्षी, कीटक, सरीसृप प्राणी, जीवाश्म यांचे नमुने पाहताना पृथ्वीची निर्मित, मानवाची उत्क्रांती, जैवविविधता याचा इतिहास सांगणारी मांडणी उत्क्रांती इतिहास संग्रहालयात केलेली असते.
३. सजीव संग्रहालय :
वनस्पती उद्यान, प्राणी संग्रहालये, सर्पोद्यान, मत्स्य संग्रहालय यासारखी ठिकाणे जीवसृष्टीचा परिचय करून घेण्यासाठी महत्त्वाची ठिकाणे आहेत. वनस्पती व प्राणी यांची शरीर रचना, हालचाली, सजीवांचे सहसंबंध, माणूस आणि निसर्ग यांचे नाते अशा अनेक गोष्टींचे दर्शन घडवण्यासाठी ही संग्रहालय अभ्यासकांसाठी महत्त्वाची ठिकाणे आहेत
४. विशेष संग्रहालय :
वेगवेगळ्या शैक्षणिक, सामाजिक आणि प्रशासकीय संस्थांची संस्थांतर्गत संग्रहालय विशेष परवानगी घेऊन पाहता येतात. सैन्यदल, रेल्वे, संरक्षण विभाग, हवामान विभाग यांसारख्या विशेष खात्यांच्या संग्रहालयांचा समावेश यात होतो. काही वेगळ्या प्रकारच्या वस्तूंच्या संग्रहालयांचा पण या यादीत समावेश करता येईल ; जसे बाहुली संग्रहालय, रेल्वे मोडेल्स संग्रहालय, सायकल संग्रहालय, इ. व्यक्तींची जीवनदर्शनी मांडणाऱ्या संग्रहालयांचा समावेश पण या यादीत करता येईल.
५. आंतरजालावरील व्हर्च्युअल संग्रहालय :
वेळ,अंतर आदीचा विचार करता जगभरातील संग्रहालये घरबसल्या पाहता यावीत, यासाठी आज आंतरजालावर अनेक प्रसिद्ध संग्रहालयांची व्हर्च्युअल संग्रहालये पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. दोन प्रकारच्या भेटी उपलब्ध आहेत. गॅलरी भेटी आणि ३ D भेटी.
संग्रहालय भेटीची उद्दिष्टे :
१. संग्रह पाहताना मांडलेल्या वस्तूंचे निरीक्षण करणे. त्या वस्तूचे दिलेले वर्णन व प्रत्यक्ष वस्तू यांची तुलना करणे. प्रदर्शनातील दोन वस्तूंची तुलना करून त्यांच्यातील साम्यभेद शोधणे .
२. संग्रहालयात वस्तूंची मांडणी विशिष्ट क्रमाने केलेली असल्याने मांडणी संदर्भात वस्तूंच्या विशेष गुणधर्मात होणारे बदल शोधणे ,त्यांचा होत जाणारा विकास समजून घेणे.
३. प्रदर्शनातील वस्तूंचे गुणधर्म शोधणे व त्यांचे वर्गीकरण करणे.
४. इतिहासाच्या मोठ्या कालखंडाचे संकलन करण्याचे कौशल्य शिकणे.
संग्रहालय भेटीचे नियोजन :
शालेय सहलीमध्ये बरेचदा संग्रहालय भेट योजलेली असते पण आपण तेथे कशासाठी आलो आहोत, काय व का पाहणार आहोत याची कल्पना बरेचदा विद्यार्थी व शिक्षक या दोघांच्या मनात स्पष्ट नसते. विद्यार्थी अनियंत्रित पद्धतीने संग्रहालयात फिरत असतात किंवा प्रत्येक वर्णन फलकावरील माहिती वहीत उतरवून घेण्यात मग्न असतात. संग्रहालयाला भेटीचे योग्य नियोजन केल्यास हा एक उत्तम शैक्षणिक अनुभव ठरू शकतो. यासाठी तीन टप्प्यांवर संग्रहालय भेटीचे नियोजन करावे.
१. संग्रहालय भेटीची पूर्वतयारी :
विद्यार्थ्यांच्या मनात भेटीबद्दलची उत्सुकता व कुतूहल निर्माण करणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांना संग्रहालय भेटीच्या नियोजनात सहभागी करून घेतल्यास त्यांचा भेटीतील सहभाग सकारात्मक राहील. संग्रहालयात ज्या वस्तूंची मांडणी केली आहे त्या अनुषंगाने योग्य ते पूर्वज्ञान विद्यार्थ्यांना व्हावे यासाठी विशेष व्याख्यानांची योजना करावी. भेटीसाठी महत्त्वाचे ठरतील असे काही प्रश्न विद्यार्थ्यांना काढण्यास सांगावेत. भेटीपूर्वी शक्य असेल तर अध्यापकाने संग्रहालयाला पूर्व भेट द्यावी. पूर्व भेट देणे शक्य नसेल तर संग्रहालयाचे संकेतस्थळ पहावे, संग्रहालयामार्फत प्रकाशित माहिती पुस्तका; छायाचित्र पुस्तिका; भेट कार्ड यासारखे साहित्य मागून घ्यावे. संग्रहालय भेटीची वेळ संग्रहालयाचे सुट्टीचे दिवस विचारात घेऊन निश्चित करावी. त्यादृष्टीने आधी पत्रव्यवहार करावा. संग्रहालय भेटीच्या दरम्यान मार्गदर्शक/गाईड देण्याची विनंती करावी. संग्रहालयातील तज्ज्ञ, संग्रहालय व्यवस्थापक याची भेट व मुलाखत घेऊ देण्याची विनंती करावी. भेटीच्या शुल्कात विद्यार्थी सवलत देण्याची विनंती करून शुल्कात सवलत मिळावी.
२. भेटीच्या दरम्यान :
विद्यार्थ्यांचे गट करून त्यांना संग्रहालयात फिरण्याचा मार्ग निश्चित करून द्यावा. गटप्रमुख ठरवून गटाने कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी पाहायच्या आहेत, त्यांची वैशिष्ट्ये नोंदवायची आहेत याची यादी त्यांना द्यावी. प्रत्येक विद्यार्थ्याने प्रदर्शनी बघावी पण प्रत्येक विद्यार्थ्याने प्रत्येक वस्तूबद्दल माहिती मिळवणे आणि नोंदवणे गरजेचे नाही. गटाकडे सर्व माहिती गोळा होईल याची काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांना माहिती नोंदवण्यासाठी एक
नोंदपत्रक द्यावे. त्यात त्याला आवडलेल्या व भावलेल्या कोणत्याही पाच वस्तूंचे वर्णन त्याच्या शब्दात लिहिण्यास सांगावे. नोंद वहीत काही वस्तूंचे पेन्सिलने आरेखन करण्यास सांगावे. संग्रहालय भेटीचा साठ टक्के वेळ नियंत्रित असावा तर चाळीस टक्के वेळ विद्यार्थ्यांना संग्रहालयात मुक्तपणे फिरू द्यावे. भेटीच्या वेळी संग्रहालयामार्फत प्रकाशित छायाचित्र पुस्तिकेतील चित्रे देऊन त्या वस्तूंचे दालन शोधणे किंवा खजिनाशोध यासारखे खेळ योग्य नियोजन केल्यास घेता येतील.
३. भेटीनंतर :
संग्रहालय भेटीनंतर विद्यार्थ्यांना भेटीचा सचित्र व्हाल अहवाल तयार करण्यास सांगावा. संग्रहालयास संदर्भात पर्यटन माहिती पत्रक तयार करणे, ऑडिओ-व्हिडिओ गाईड तयार करणे यासारखी कामे विद्यार्थ्यांना देता येतील. विद्यार्थ्यांच्या मनातील प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी प्रश्नोत्तर सत्र योजावे. संग्रहालय भेटीसाठी मदत केलेल्यांना आभार पत्र पाठवावीत.
संग्रहालय, कलादालन या समाज शिक्षणासाठी निर्माण झालेल्या रचना आहेत. शाळेमार्फत औपचारिकपणे संग्रहालय व प्रदर्शने पाहण्याची योजना आखावीच पण अशा भेटींसाठी पालकांचा सहभाग घेऊन पालकांनी कौटुंबिक सहलींच्या वेळी संग्रहालये, कलादालने यांनी भेटी देण्याचा आग्रह धरावा. विद्यार्थ्याने संग्रहालये, कलादालने , प्रदर्शने पालकांबरोबर पाहिल्यास संग्रहालयांनी समाज शिक्षणाचे काम करावे हे उद्दिष्ट साध्य होईल. कारण संग्रहालये ही समाजशिक्षण केंद्रे आहेत. आकारिक मूल्यमापनात पालकांचा सहभाग वाढवण्यासाठी अशा कौटुंबिक संग्रहालय भेटी उपयोगी ठरतील.
प्रशांत दिवेकर
ज्ञान प्रबोधिनी, पुणे
सर मला तुमची ऑडियो गाईड ची कल्पना खूप आवडली.संग्रहालय भेटी चे नियोजन खूपच उपयुक्त आहे.
ReplyDeleteWonderful idea. This can be further used to teach history through stories associated with each specimen.
ReplyDeleteखूपच छान लिहिलं आहे. नियोजन करण्यासाठी खूपच उपयुक्त आहे.
ReplyDelete