बॉर्न फ्री... लिव्हींग फ्री...फॉर एव्हर फ्री...
माझ्या आवडत्या कादंबऱ्यांपैकी एक आणि सिनेमांपैकी एक ‘बॉर्न फ्री’.
आफ्रीकेच्या जंगलात जोय् आणि जॉर्ज अॅडमसन या कुटुंबाने एल्सा या अनाथ सिंहिणीला कसे वाढवले याची ही कथा आहे. जॉर्जला एकदा जंगलात हिंडताना तीन सिंहाचे बछडे सापडले. जॉर्ज त्यांना घेऊन त्याच्या कॅम्पवर आला. कालांतराने यातील दोन बछड्यांची प्राणी संग्रहालयात रवानगी करण्यात आली. पण छोटी एल्सा मात्र जोय् आणि जॉर्ज बरोबर राहिली. एल्सा मोठी झाल्यावर अशा काही घटना घडल्या की एल्साला एकतर जंगलात सोडणे किंवा तिची प्राणी संग्रहालयात रवानगी करणे असे दोनच पर्याय जोय् आणि जॉर्जसमोर जंगल खात्यामार्फत ठेवले जातात. जंगलात एल्साचे पुनर्वसन करणे अवघड काम असते पण जोय् आणि जॉर्ज हाच पर्याय स्वीकारतात.
बंदिस्त पिंजऱ्यात एल्साला न पाठवता तिला पुन्हा जंगलात स्वतंत्र करण्याचे ठरवतात. या प्रयत्नासाठी त्यांना ३ महिन्यांची मुदत मिळते. जोय् आणि जॉर्जबरोबर राहून एल्सा माणसाळलेली असते. तिला शिकार करता येत नसते ना न सोललेला प्राणी खाता येत असतो. अशा परिस्थितीत एल्साचे तीन महिन्यात जंगलात पुनर्वसन करण्यासाठी जोय् आणि जॉर्ज काय काय प्रयत्न करतात हे सांगणारा हा चित्रपट आहे.
चित्रपटात एक प्रसंग आहे, एल्साला जंगलाची ओळख व्हावी म्हणून जोय् आणि जॉर्ज तिला जंगलात सोडतात. जंगलात तिला चिखलात डुंबणारे रानडुक्कर दिसते. एल्सा त्याच्याजवळ जाते. एक सिंहिण जवळ येते आहे हे पाहून डुक्कर बिचकते व दोन पावले दूर पळते . एल्सा पुन्हा त्याच्या जवळ जाते व त्याला गोंजारते. ते पुन्हा दूर पळते. असे दोनतीनदा घडते आणि मग ते रानडुक्कर या सिंहिणीचे पाणी ओळखते आणि एल्सा जवळ आल्यावर तिला मुसंडी देते. रानडुक्कर एल्साला मुसंड्या देऊन घायाळ करत असते पण एल्सा परत परत त्याच्या जवळ जात असते. त्याच्यावर हल्ला करायचे तिचे भान हरवलेले असते कारण जोय् आणि जॉर्जबरोबर राहताना ती इतर प्राण्यांबरोबर खेळीमेळीने राहत असते. एल्साची शिकार करण्याची नैसर्गिक प्रेरणा हरवलेली असते.
हा प्रसंग पाहात असताना मला इसापनीती आणि पंचतंत्रातील वाघाची आणि गरुडाची गोष्ट आठवते. शेळयांबरोबर राहताना वाघ आपली डरकाळीच विसरलेला असतो आणि कोंबड्यांबरोबर राहताना गरुडाचे पिल्लू आपल्या पंखांची ताकद कोंबड्यांएवढीच समजत असतो. कथा सविस्तर सांगत नाही, तुम्ही पूर्वी ऐकली किंवा वाचली असेल. आपण पण बरेचदा एल्सासारखे किंवा त्या वाघ किंवा गरुडासारखे वागतो. आपण आपल्या नैसर्गिक क्षमतांचा शोध घेत नाही. आपल्याबरोबर जे असतात त्यांच्या क्षमतांबरोबर तुलना करून आपण त्यांच्याजवळ किंवा त्यांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, पण स्वतःच्या क्षमता शोधण्याचा प्रयत्न करत नाही. आपल्या सभोवतालचे वातावरण, पालकांच्या इच्छा-आकांक्षा, कोण काय म्हणेल, कोणाला काय वाटेल, समाजात बरे दिसेल का यात गुरफटल्याने मला काय आवडते, मला काय जमते, काय जमत नाही यासाठीचा विचार करणे व अनुभव घेणे राहून जाते. मला काय आवडते किंवा काय जमते याऐवजी आपण तुला हे आवडेल, हे जमेल ते करत राहतो. हे करताना अनेक जणं स्वतःचे मूळ स्वरूप विसरतात व इतरांच्या कल्पनेतील 'मी' घडत जातो. आपली अवस्था माणसाळलेल्या एल्सासारखी होते. कायम आयते सोललेले मांस खाल्ल्याने तिला प्राणी सोलून खाता येत नाही व शिकार करायची असते ही प्रेरणा ती विसरून गेलेली असते. पालक लाडाने शाळेत गाडीने सोडतात आणि नंतर आपण किती सायकल चालवू शकू हे स्वतःलाच माहीत नसल्याने सायकलने शाळेत येण्याचे टाळतो (सायकल चालवून दमलो तर अभ्यासावर परिणाम होईल ना !!) हे शारीरिक क्षमतेबद्दलचे मग इतर क्षमता ओळखणे तर अजून अवघड आहे.
स्वतःची ओळख होण्यासाठी अनेक अनुभव घेतले पाहिजेत, अनेक कृती करून पहिल्या पाहिजेत. भारतीय परंपरेत व्यक्तीने पाच प्रकारचे अनुभव घेतले पाहिजेत असे सांगितले आहे. ·
पहिला प्रकार : ज्यात आपल्या शारीरिक क्षमतांची आपल्याला ओळख होईल. यासाठी सायकल सहली, ट्रेकिंग, साहस शिबिरांना जाता येईल. ·
दुसरा प्रकार : ज्यात आपल्याला आपल्यातील कौशल्याची ओळख होईल. यासाठी कला शिबिरांमधून हस्तकला, पाककला, संगीत, वादन , भाषण यासारख्या कौशल्यांची ओळख करून घेता येईल. ·
तिसरा प्रकार : ज्यात आपल्याला जिव्हाळा म्हणजे काय हे समजेल. यासाठी काही भेटींना जाता येईल जसे गोशाळा, दिव्यांग मुलांसाठीच्या संस्था इ. या प्रकारच्या अनुभवासाठी उत्तम चित्रपट देखील पाहता येतील.
चौथा प्रकार : ज्यात आपण आपल्या बुद्धीची कौशल्ये वापरू शकू. यासाठी विज्ञान खेळणी, वैदिक गणितासारख्या वर्गांना जाता येईल. आणि
पाचवा प्रकार : त्यात आपण ज्या सजीव निर्जीवांबरोबर राहतो, ज्या समाजात राहतो त्यांना जाणून घेऊन त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करू शकू असे अनुभव. यासाठी निसर्ग सहली, ग्रामीण दुर्गम आदिवासी भागात सहलींना जाता येईल, व्यावसायिकांबरोबर काम करण्याचा अनुभव घेता येईल.
पाठ्यपुस्तकांचा अभ्यास करण्याबरोबर वरील पाच प्रकारचे अनुभव घेतल्यास आपल्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू फुलत जातील. प्रत्येक अनुभव घेताना आपल्याला आपल्या क्षमतांची ओळख होईल आणि त्या क्षमता वाढवण्याची संधी मिळेल अशी योजना आखली पाहिजे.
गोष्टीत जोय् आणि जॉर्ज, एल्सा जंगलात शिकार करणे आणि स्वतःचे अस्तित्व टिकवण्याएवढी सक्षम झाल्यावर, एल्साला जंगलात सोडून इंग्लंडला निघून जातात. वर्षभराने एल्सा जंगलात टिकली असेल?, रुळली असेल? या आशेवर जोय् आणि जॉर्ज केनियाला परत येतात. त्यांना एल्सा सापडते, ती त्यांची ओळख विसरलेली नसते आणि... आता एल्सा तीन छाव्यांची आई झालेली असते. सिंहिण म्हणून एल्साने स्वतःला शोधलेले असते. वर्षभरातील जंगलातील वास्तव्य, निसर्ग आणि परिस्थितीने एल्सातील ‘सिंहित्व’ आता पूर्ण विकसित झालेले असते.
आपल्याला पण बरेचदा आपल्या क्षमता विशेष प्रसंगांमुळे, परिस्थितीला सामोरे जाताना माहीत होतात. विकासाची ही पद्धत नैसर्गिक आहे. पण माणूस स्वतःमध्ये ठरवून जाणीवपूर्वक बदल घडवून आणू शकतो. त्यासाठी स्वतःला शोधणे गरजेचे आहे. तरच आपल्यातील ‘मनुष्यत्व’ विकसित होऊ शकेल. स्वामी विवेकानंद म्हणतात त्या प्रमाणे आपल्यात ते मनुष्यत्व,,,, ते पूर्णत्व आहेच पण ते उलगडण्यासाठी, उकलण्यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत.
कादंबरीत एल्सा आणि तिच्या पिल्लांची कथा सांगताना जॉर्ज एके ठिकाणी लिहितो - “My heart was with them wherever they were. But it was also with these two lions here in front of us; and as I watched this beautiful pair, I realized how all the characteristics of our cubs were inherent in them. Indeed, in every lion I saw during our searches I recognized the intrinsic nature of Elsa, Jespah, Gopa and Little Elsa, the spirit of all the magnificent lions in Africa''
हेच आपल्यातील स्पिरीट शोधणे म्हणजे “बॉर्न फ्री... ते... लिव्हींग फ्री” हा प्रवास होय.
.फॉर एव्हर फ्री...बद्दल नंतर कधीतरी.
( प्रशिक्षक फेब्रुवारी २०२० मध्ये प्रकाशित )
Born free, as free as the wind blows
As free as the grass grows
Born free to follow your heart
As free as the grass grows
Born free to follow your heart
Live free and beauty surrounds you
The world still astounds you
Each time you look at a star
The world still astounds you
Each time you look at a star
Stay free where no walls divide you
You're free as the roaring tide
So there's no need to hide
You're free as the roaring tide
So there's no need to hide
Born free and life is worth living
But only worth living
'Cause you're born free
But only worth living
'Cause you're born free
Stay free…
मस्त 👍🏼
ReplyDelete