समृद्ध
सांस्कृतिक परंपरा
भारताच्या पार पूर्वेला असलेल्या लाजो
गावात आमचा मुक्काम होता. अरुणाचल प्रदेशातील तिराप
जिल्ह्यातील डोंगराच्या कुशीत, डोंगराच्या
उतारावर वसलेले लाजो.
आमच्या दिवसाची सुरुवात मोठ्या धामधुमीत झाली. आज लाजो जनजातीचा पूजेचा वॉराँग सणाचा दिवस
होता. गावातील सर्वांनी पिसांच्या टोप्या, रंगीत खड्यांचा
माळा, हस्तीदंती दागिने, सुंदर
लाल-काळ्या रंगांत कलासुर केलेला पारंपारिक पोशाख केला होता. ढोल घेऊन गावातील सर्व
लोक पुजेच्या झाडाजवळ गोळा झाले. नंतर ढोलाच्या नादात नृत्य करीत गाव फेरी करण्यात
आली. दिवसभर विविध पूजा चालू होत्या. सायंकाळी गावच्या राजाने आणि
पुजार्याने गावाचे, शेतीचे, आरोग्याचे अभिष्टचिंतन करणाऱ्या प्रार्थना केल्या.
दिवसभर ढोल घेऊन डोंगर उतारावरच्या या गावात
गावफेर्या
करणारे तरुण रात्री गावातल्या मध्यवर्ती मैदानात वेगवेगळ्या प्रकारची आदिवासी
नृत्य करीत ढोलाच्या तालावर धुंद होऊन रात्रभर नाचत होते. आमच्यासाठी उत्सवाचा तो
वेगळाच अनुभव होता.
ईशान्य भारत अभ्यास व मैत्री अभियानात सातही
राज्यातील खेड्यापाड्यांवर घरोघरी राहून त्यांच्यासारखं
राहू,खाऊ, त्यांच्या
सण-पूजा, उत्सवांत
सामील होऊ असं ठरवून या निसर्गपुत्रांच्या लोकजीवनाचे रंग समजून घेण्यासाठी गावोगावी
मुक्कामला गेलो होतो. या संपूर्ण अभ्यास
दौऱ्यामध्ये आम्ही युवकांनी अनुभवलेले, पहिलेले लोकजीवन खरच विलोभनीय आहे.
ईशान्य भारतात असंख्य जनजाती
राहतात. नैसर्गिक, भौगोलिक
विविधतेबरोबरच त्यांच्या भाषा, पोशाख, खाद्य संस्कृती,
सण या परंपराही वेगळ्या.
पूर्वांचलातील अनेक जनजाती महाभारत काळात भारतीय संस्कृतीशी असलेले नाते सांगतात. अरुणाचल
प्रदेशातील दिबांग व्हॅली जिल्ह्यातील ईदू मिश्मी
स्वतःला 'रुक्मी' चे वंशज
मानतात. भगवान श्रीकृष्णाने देवी रुक्मिणीचे हरण
केल्यानंतर रुक्मिणीचा भाऊ रुक्मी व
श्रीकृष्ण यांच्यात लढाई झाली. त्यात रुक्मीचा पराभव झाला. रुक्मिणीने कृष्णाजवळ रुक्मीला जीवनदान मागितले. पण पराभवाचे प्रतीक
म्हणून श्रीकृष्णानी रुक्मीच्या केसांचा पाट काढला. आजही इदू लोक याचे
प्रतीक म्हणून आपले केस विशिष्ट प्रकारे कापतात. दिमासा, कचारी जनजाती
हिडिंबा घटोत्कच याचे वंशज
आहेत.
निसर्गसंपन्नतेने यांचे जीवन
समृद्ध, स्वयंपूर्ण आहे. अरुणाचल प्रदेश, नागालँडमधील घरे पावसापासून संरक्षण करण्यासाठी उंच बांबूवर अथवा
डोंगर उतारावर बांधलेली असतात. घरबांधणीत बांबू,
लाकूड, गवताचा वापर प्रामुख्याने केला जातो.
घरांच्या आंतररचनेत दर्शनी एक मोठी खोली व काही
छोट्या खोल्या असतात. घरांमध्ये शौर्याचे, ऐश्वर्याचे प्रतीक म्हणून शिकार केलेल्या
जनावरांची डोकी घरात टांगलेली
असतात. मध्यभागी एक मोठी चूल
असते. चूलीवरती एका लाकडी शिंकाळ्यावर, लाकडे, मांस स्मोकिंगसाठी
ठेवलेले असते. थंडी व पावसाने घराचे
बहुतांश व्यवहार या चुलीभोवती केले जातात. अरुणाचलात
ज्या जनजातीमध्ये बहुपत्नीत्वाची चाल आहे. त्यात बायकांच्या संख्येनुसार ‘चांग’ घराची
लांबी वाढते. इथली बहुतांश गावे स्वयंपूर्ण आहेत. गावात गावबुडा व इंगु-पुजारी या
महत्त्वाच्या व्यक्ती असतात. अनेक कामे गाव मिळून करते. एखाद्याचे घर बांधायचे
असेल, तर सर्व गाव कामाला लागते. त्यामुळे एक-दोन दिवसात
त्याचे घर बांधून पूर्ण होते. त्याच्या बदल्यात त्याने आपल्या ऐपतीप्रमाणे गावाला '
बडा खाना ' द्यायचा असतो.
ईशान्य भारतातील अनेक जनजातीत एक वेगळी परंपरा दिसली. तेथे लग्नात
मुलीकडच्यांनी मुलाला हुंडा न देता
मुलाने मुलीकडच्यांना हुंडा द्यायचा असतो. हा हुंडा प्रतीकात्मक असतो. बऱ्याचदा ' मिथुन ' ( रानगव्याचा जातभाई ) हुंडा म्हणून दिला
जातो. अरुणाचलात सांस्कृतिक दृष्ट्या मिथुनला
खूपच महत्त्व आहे. लग्न, पूजा,
उत्सवांचा अविभाज्य भाग म्हणजे मिथुन. मिथुनचा वापर पूजांमध्ये बळी
देण्यासाठी केला जातो. पुजांत अनेक वेगवेगळ्या
निसर्गदेवतांची पूजा केली जाते. अनेक जनजाती
विविध स्वरूपात-प्रामुख्याने 'दोनी-पोलो ' म्हणजे चंद्र- सूर्याची
पूजा करतात.
अरुणाचलात सेजुसा गावात गेलेल्या गटाला त्यावेळी तेथील गाव
गावबुढ्याचे निधन झालेले असल्याने त्यांचे
अंत्यसंस्कार व त्यांच्या पूजा यात सहभागी
होता आले. या निसर्गपुत्रांच्या बारशांपासून
अंत्यसंस्कारांमध्ये सर्व प्रकारे निसर्गाशी एकतानता साधली आहे. उदाहरणादाखल मोम्पा जनताजातीत अंत्यसंस्काराच्या वेळी शरीराचे 108 तुकडे करून ते नदीच्या
पाण्यात माशांना खाण्यासाठी सोडलेले जातात.
इथल्या लोकांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे, त्यांचे पारंपारिक पोशाख व हत्यारे. प्रत्येक घरात हातमाग असतो व त्यावर पारंपारिक पोशाख विणले जातात.
प्रत्येक जनजातीचे पोशाख, त्यावरील कलाकुसर वैशिष्ट्यपूर्ण
असते व त्यावरून व्यक्ती कोणत्या जनजातीची
आहे, ते ओळखता येणे शक्य असते. पोशाख ही त्या त्या जनजातीची
' आयडेंटिटी ' असते. निशी लोक
त्यांच्या टोपीत
हॉर्नबिल पक्षाच्या चोचीचा
वापर करतात.
आहाराच्याबाबतीत ' जीवो
जीवस्य जीवनम् ' यावर त्यांचा पूर्ण विश्वास आहे . शिकार करणे , हा शेतीबरोबर मुख्य उद्योग आहे. शिकारीसाठी दाव-स्थानिक पारंपारिक
तलवार व धनुष्यबाण , बंदुकांचा वापर केला जातो. आहारातील अजून एक मुख्य पदार्थ म्हणजे अपांग.
अपांग म्हणजे घरगुती RICE BEER. विविध ठिकाणी अपांग चौखम, खम, मधू आदी
स्थानिक नावांनी ओळखली जाते. अपांग पिणे हा
खास ईशान्य भारताचा पाहुणचार आहे.
गावाच्या, समाजाच्या
रचनेत कालानुरूप लोप होत असलेली प्रमुख रचना म्हणजे मोरुंग/ झोलबुक( युथ क्लब).
गावात पारंपारिक लोकशिक्षणाचे तरुणांच्या प्रशिक्षणाचे केंद्र म्हणजे मोरुंग.
गावात तरुण-तरुणींसाठी
स्वतंत्र मोरुंग असतात. विशिष्ट वयानंतर सर्वजण मोरुंगचे सभासद
होतात व लग्न होईपर्यंत मोरुंगमध्ये निवास करतात. मोरुंमध्ये गावातील जेष्ठ,
तरुणांना शस्त्रविद्या, समाजाचे
नियम आचार यांचे प्रशिक्षण देतात.
मेघालयात गेलेल्या युवतींच्या गटाला एक वेगळी वैशिष्ट्यपूर्ण समाजरचना अनुभवता आली. मेघालयातील
जनजातीमध्ये मातृसत्ताक पद्धत आहे. घराचे प्रमुख व्यवहार स्त्री पाहते. स्त्रीला
घरात मानाचे स्थान असते. लग्न झाल्यावर मुलगा सासरी मुलीच्या घरी राहायला येतो. घरचा
वारसा हा घरातील धाकटी मुलगी असते. घरात मामाचा सल्लामहत्त्वाचा मानला जातो. एखाद्या घरात तुमचे स्वागत करायला त्या घरातील कर्ती स्त्री पुढे येते. एवढ्या लांबून महाराष्ट्रातून मुली आल्या आहेत.
आपल्याबरोबर राहत आहेत, याचे
त्यांना अप्रूप वाटले. शिलॉंगमध्ये
महाराष्ट्रातील युवतींसाठी खास मातृहस्ते
भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यांचा पाहुणचार , आदरातिथ्य एवढे भावणारे होते, की भाषेची अडचण असून अनेकदा या पलीकडचा भावनांचा संवाद साधणे शक्य झाले.
ईशान्य भारतात असंख्य भाषा बोलल्या जातात. प्रत्येक जनजातीची
भाषा वेगळी. एकाच खोऱ्यात राहणाऱ्या दोन जनजातींना त्यामुळे एकमेकांशी संवाद साधता येत नाही. अनेक भाषांना लिपी नाही. त्यामुळे त्या
भाषेत लिखाण करता येत नाही. ईशान्य भारतातील सातही राज्यांना त्यामुळेच एकमेकांशी
संवाद साधण्यात मर्यादा पडतात.
सातही राज्यात पण प्रामुख्याने मेघालय, मणिपूरमध्ये
दैनंदिन व्यवहारात स्त्रिया प्रमुख आहेत. घरे चालविण्यासाठी त्या प्रचंड कष्ट करतात.
मणिपूरचे वैशिष्ट्य म्हणजे तेथील 'इमा' मार्केट.
इमा म्हणजे स्त्री. तेथील बाजारातील विक्रीचे सर्व व्यवहार स्त्रिया करतात. आम्ही
पाहिलेल्या इम्फाळ सारख्या राजधानीच्या मोठ्या शहरातील मोठा बाजार हासुद्धा इमा
मार्केटच होता.
माजुली हे ब्रह्मपुत्रा नदीतील 1261 चौ. किमी. क्षेत्रफळ असलेले
बेट आहे. महाराष्ट्रात जसे ज्ञानेश्वर, तसे आसाममध्ये श्री श्री शंकरदेव या शंकरदेवांचे प्रमुख क्षेत्र म्हणजे
माजुली. तेथील
सत्रांत पारंपारिक बिहू नृत्य पाहता आले. त्यात सहभागी झालो. आसाम, त्रिपुरा या दोन राज्यात शारदा, कामाख्या (कालीमातेची)
उपासना मोठ्या प्रमाणात केली जाते. मणिपूरमधील मैतेई लोक वैष्णव धर्माचे अनुयायी
आहेत. चैतन्य महाप्रभूंचे मोठे कार्य या भागात आहे. आसाम,
मणिपूरमध्ये होतो तेव्हा वसंत पौर्णिमेनिमित्त
रासलीलेचा उत्सव होता. इम्फालमधील
श्री गोविंदजी मंदिरात
संपूर्ण रात्रभर रासलीला नृत्य केले जाते. शंख, मृदुंग, टाळ यांच्या तालावर
मणिपूरी
नृत्य करत श्री गोविंदजींची
आराधना संपूर्ण रात्रभर केली
जाते. मणिपुरी नृत्याची साधना पाहणे, हा एक विलक्षण अनुभव होता. ईशान्य भारतात मोम्पा, शेर्डुप्कन , खाम्पटी
आदी बौद्ध धर्मीय जनजाती राहतात. तवांग भागात
हिमालयाच्या कुशीत डोंगराळ भागात आठ हजार ते दहा हजार फूट उंचीवर मोम्पा लोक
राहतात. तवांगची बौद्धधर्मीय अभ्यास क्षेत्र व प्रशिक्षण केंद्र असलेली मोनॅस्ट्री
हे भारताचे एक वैशिष्ट्य. ल्हासानंतर बौद्ध धर्माचे एक प्रमुख केंद्र. तवांग
मोनॅस्ट्रीमधील
बुद्धाची मूर्ती भव्य
व देखणी आहे. येथे बौद्ध
लामांच्या प्रशिक्षणाची सोय आहे. मोम्पा
समाजात घरात तीन
मुलगे असतील, तर मधला मुलगा धर्माला देणे बंधनकारक आहे. 1962
च्या चीनच्या आक्रमणात याच मोम्पा लोकांनी भारतीय सेनेला मोठी मदत केली होती. चिन
आक्रमणाचा प्रतिकार करण्यात जसवंत गड ते सेला पास (12500 फूट) येथे
झालेल्या
लढ्यात जसवंतसिंग व त्यांचे दोन साथीदार आणि सेला , नूरा या दोन मोम्पा युवतींनी प्रतिकार
करून तीन दिवस चिनी सेनेला रोखून धरले होते.
दुर्दैवाने आपल्याला याची माहिती नाही. मोम्पा लोकांच्या
बलिदानाची दखल घेतली गेली नाही.
ईशान्य भारतात पश्चिमात्यीकारणाच्या
प्रभावामुळे समृद्ध वैशिष्ट्यपूर्ण जनजातींच्या सांस्कृतिक वैविध्याचा रास
झाल्याचे प्रामुख्याने मिझोराम व नागालँड मध्ये दिसून येते. हे भारताचे
वैशिष्टपूर्ण वैभव टिकण्यासाठी या भागाच्या विकासासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. नागालँड मध्ये मेसुलुमी हे
ब्रह्मदेशाच्या सीमेजवळ असणाऱ्या पतकोई पर्वतरांगातील डोंगर उतारावर, मध्यावर वसलेल्या खेड्यात आम्ही पाच दिवस मैत्री शिबिरासाठी राहिलो
होतो. या खेड्यात चाकेसांग जनजातीचे लोक
राहतात. मैत्री शिबिरामुळे गावातील मुलांशी आणि
तरुणांशी चांगली ओळख झाली. या गावातील काही मुले महाराष्ट्रात नागा
विद्यार्थ्यांसाठीच्या वसतिगृहात शिक्षणासाठी आली आहेत. त्यांनी दुभाष्याचे काम कले. गाव्बुध्याशी गप्पा मारताना आम्ही आपले
सण, लग्न, बार्शी, अंत्येष्टी आदी गोष्टी कशा असतात ते सांगितले. थोडावेळ ते शांत बसले आणि म्हणाले," महाराष्ट्रात समृद्धीचे प्रतीक म्हणून
लग्नानंतर मुलगी धान्याचे माप ओलांडून घरी येते, तर आमच्यात
हातात भाताच्या
ओंब्या व अपांग घेऊन येते, उंबरा ओलांडायच्या
ऐवजी लोखंडावर पाय देऊन मुलगी घरात येते. कारण संसार
कणखरपणाने व शांत वृत्तीने केला पाहिजे, हेच याचे प्रतीक. या गोष्टी वेगळ्या असल्या तरी याचा अर्थ एकच आहे, की
शेवटी आपण भारतीयच आहोत. निर्माण केलेले अंतर दूर करण्याचा
प्रश्न आहे. असेच येत राहा. इथल्या मुलांना भारत दाखवा; सर्व प्रश्न-समस्या आपोआप दूर होतील.”
असं
त्या गावबुढयानं सांगितलं. खरंच हा आशावाद घेऊन मैत्री अभियानाचे बंधन दृढ होतील, असं वाटतं.
प्रशांत दिवेकर
ज्ञान प्रबोधिनी
युवा सकाळ, २६ जुलै २००५ , मंगळवार
Comments
Post a Comment