सध्या लॉक डाऊनच्या काळात चिरंजीवांबरोबर संध्याकाळी तबल्याची मास्तरकी करतो आहे. (संगीतातील ओ कळत नसल्याने 'मास्टरकी' करता येत नाही 😊) त्याच्या वहीत लिहिलेले बोल म्हणून तोंडाचा आणि जिभेचा व्यायाम करून घेतो, लॉक डाऊनच्या काळात बोलण्याची सवय सुटायला नको.😊
परवा सहज तबल्यावरती हात चालवत होतो आणि 'डट्ट टरडट् डट्ट टरडट् .....' हा जुना ठेका आठवला आणि आठवीत असताना दामले सरांच्याकडून घोष पथकात शिकलेले काही बोल आठवले. इंग्लिश बरोबर संगीताची जन्मतः आतून जाण असलेले दामले सर. आजही जेव्हा एखाद्या कार्यक्रमात ' जोहर मायबाप ' ऐकतो तेव्हा दामले वाड्याच्या बाहेरील कट्टयावर बसलो असताना वाड्यात पायपेटीवर जोहर मायबापचे सरांचे ऐकलेले सुरच ऐकू येतात.
दामले सर आमचे चितळे मास्तरच. आमचा वर्ग भाग्यवान सरांनी आम्हाला पाचवी ते आठवी इंग्रजी शिकवले. दोन वर्षांपूर्वी व्हॉट्सअपच्यामुळे संपर्कात येऊन दहावीच्या तुकडीतील आम्ही पंधरा वीसजण एकत्र जमलो होतो. तेव्हा अनेक शिक्षकांच्या आठवणी निघाल्या. अनेक जणांच्या सवयी , लकबी यांची नक्कल देखील केली. त्यावेळी पाचवीच्या वर्गात इंग्रजी मुळाक्षरे शिकवल्यानंतर त्यांचा वहीत सराव करून घेताना सर अक्षर कसे असावे याबद्दलचे बोल ' वाकडं नको ..तिकडं नको ... फेंगड नको ...लुकड नको' असे काहीही तालात वर्गाकडून म्हणून घेत असत. ते आठवले. पुढे व्याकरण शिकवताना 'आलं इंग लावलं बिंग ' : आयनजी आले तर बीईआयनजी लावायचे अशी अनेक सूत्रे तालात म्हणून घेत त्यांनी सूत्रे आमच्यात मुरवली.
' एका फटक्यात सात' ही गोष्ट तर त्यांनी कित्येक दिवस आम्हाला सांगितली होती. त्यातील नायक चहा कसा पितो याचे वर्णन तासभर केले होते आणि वर्गाची हसूनहसून पुरेवाट झाली होती. विनोद निर्मितेचे एक स्वभावातःच अंग त्यांच्यात होते. माझे सख्खे शेजारी असल्याने सर बरेचदा क्रिकेट मॅच बघायला घरी येत असत, त्यावेळी मॅचपेक्षा मॅचवर चालू असलेली सरांची विनोदी कॉमेंट्री हेच आमच्यासाठी आकर्षण असे.
आठवीत असतानाचा एक प्रसंग. एका तासाला वर्गात सरांनी काही काम दिले होते. काम करून झाल्यावर मागे बसलेले आम्ही (उंच असल्याने कायमच मी बॅकबेंचर होतो.) चार-पाच जण कोंडाळे करून काही गप्पा मारून लागलो. काम झाले का याची चौकशी करण्यासाठी सर वर्गाच्या मागच्या बाजूला आले. त्यांनी दिलेला अभ्यास पूर्ण झाला का याची चौकशी केली आणि आता काय करत आहात असे विचारले . तेव्हा आमच्यापैकी एकाने सर आमची गॅंग आहे असे सांगितले. ( त्यावेळी अंकुश, प्रतिघात या सिनेमांचा प्रभाव होता ) गॅंग हा शब्द ऐकताच सरांनी आम्हाला उभे केले. ज्या सरांनी चार वर्षात वर्गातील मुलांना टप्पल देखील मारली नव्हती, त्यांनी आमची चांगलीच धुलाई केली. आवडते सर असल्याने काय चुकले विचारण्याची सोय नव्हती.
संध्याकाळी शाळा सुटल्यावर घरी परतताना सरांना विचारले आज वर्गात आमचे काय चुकले ? सर म्हणाले 'माझ्या विद्यार्थ्यांचा गट असू शकतो , त्यांची टीमअसू शकते , त्याचा संघ असू शकतो पण गॅंग असू शकत नाही.'
त्यावेळी याचा अर्थ किती कळला होता माहित नाही पण गॅंग शब्दाला नकारात्मकता आहे आणि टीम या शब्दाला सकारात्मकता आहे, एवढेच कळले.
आज अध्यापक म्हणून या प्रसंगाकडे मागे वळून बघताना माझ्या विद्यार्थ्यांनी कसे असायला पाहिजे याबद्दल परीक्षेतील उत्तम यश, ज्ञानातील उत्तमता, कौशल्यातील उत्तमता यापुढे जाऊन गुणातील /मूल्यातील उत्तमता याचा विचार आपण करतो का ? याबद्दल मला प्रश्न पडतो.
याबाबत मी माझ्या विद्यार्थ्यांनी कोणता शब्द वापरावा, कोणता वापरू नये, कोणती कृती करावी, कोणती करुनये याबद्दल दामले सरां एवढा मूल्यात्मक आग्रह धरतो का ? धरू शकतो का ? असा प्रश्न मनात येतो आणि आपण असेच आग्रही असावे लागेल याबद्दलचा विचार दृढ होतो.
प्रशांत दिवेकर
२७ एप्रिल २०२०
खूप छान...
ReplyDeleteखरंय सर,आग्रही व्हावेच लागते .अतिशय भावणारा लेख आहे.
ReplyDeleteB.Ed. Internship साठी इंग्रजी मिडीयम च्या वर्गात गेलो होतो. एका मुलानी *अरे यार* असा slang word वापरला.
ReplyDeleteत्यावर त्यांच्या टीचर म्हणाल्या.
Don't use these slang words, this is bad manners.
त्या कितीपत बरोबर आहेत??
Purva - खूप छान,
ReplyDelete