Skip to main content

माझ्या मुलांची गॅंग असू शकत नाही !!!




            सध्या लॉक डाऊनच्या काळात चिरंजीवांबरोबर संध्याकाळी तबल्याची मास्तरकी करतो आहे. (संगीतातील ओ कळत नसल्याने 'मास्टरकी' करता येत नाही 😊) त्याच्या वहीत लिहिलेले बोल म्हणून तोंडाचा आणि जिभेचा व्यायाम करून घेतो, लॉक डाऊनच्या काळात बोलण्याची सवय सुटायला नको.😊

             परवा सहज तबल्यावरती हात चालवत होतो आणि 'डट्ट टरडट् डट्ट टरडट् .....' हा जुना ठेका आठवला आणि आठवीत असताना दामले सरांच्याकडून घोष पथकात शिकलेले काही बोल आठवले. इंग्लिश बरोबर संगीताची जन्मतः आतून जाण असलेले दामले सर. आजही जेव्हा एखाद्या कार्यक्रमात ' जोहर मायबाप ' ऐकतो तेव्हा दामले वाड्याच्या बाहेरील कट्टयावर बसलो  असताना वाड्यात पायपेटीवर जोहर मायबापचे सरांचे ऐकलेले सुरच ऐकू येतात. 


         दामले सर आमचे चितळे मास्तरच. आमचा वर्ग भाग्यवान सरांनी आम्हाला पाचवी ते आठवी इंग्रजी शिकवले. दोन वर्षांपूर्वी व्हॉट्सअपच्यामुळे संपर्कात येऊन दहावीच्या तुकडीतील आम्ही पंधरा वीसजण एकत्र जमलो होतो.  तेव्हा अनेक शिक्षकांच्या आठवणी निघाल्या.  अनेक जणांच्या सवयी , लकबी यांची नक्कल देखील केली. त्यावेळी पाचवीच्या वर्गात इंग्रजी मुळाक्षरे शिकवल्यानंतर त्यांचा  वहीत सराव करून घेताना सर अक्षर कसे असावे याबद्दलचे बोल ' वाकडं नको ..तिकडं नको ... फेंगड नको ...लुकड नको' असे काहीही तालात वर्गाकडून म्हणून घेत असत. ते आठवले. पुढे व्याकरण शिकवताना 'आलं इंग लावलं बिंग ' : आयनजी आले तर बीईआयनजी लावायचे अशी अनेक सूत्रे तालात म्हणून घेत त्यांनी सूत्रे आमच्यात मुरवली. 


            ' एका फटक्यात सात' ही गोष्ट तर त्यांनी कित्येक दिवस आम्हाला सांगितली होती. त्यातील नायक चहा कसा पितो याचे वर्णन तासभर केले होते आणि  वर्गाची हसूनहसून पुरेवाट  झाली होती. विनोद निर्मितेचे एक स्वभावातःच अंग त्यांच्यात होते. माझे सख्खे शेजारी असल्याने सर बरेचदा क्रिकेट मॅच बघायला घरी येत असत, त्यावेळी मॅचपेक्षा मॅचवर चालू असलेली सरांची विनोदी कॉमेंट्री हेच आमच्यासाठी आकर्षण असे.


            आठवीत असतानाचा  एक प्रसंग. एका तासाला वर्गात सरांनी काही काम दिले होते.    काम करून झाल्यावर मागे बसलेले आम्ही (
उंच असल्याने कायमच  मी बॅकबेंचर होतो.) चार-पाच जण कोंडाळे  करून काही गप्पा मारून लागलो. काम झाले का याची चौकशी करण्यासाठी सर वर्गाच्या मागच्या बाजूला आले.  त्यांनी  दिलेला अभ्यास पूर्ण झाला का याची चौकशी केली आणि आता काय करत आहात असे विचारले . तेव्हा आमच्यापैकी एकाने सर आमची गॅंग आहे असे सांगितले.
( त्यावेळी अंकुश, प्रतिघात या सिनेमांचा प्रभाव होता ) गॅंग हा शब्द ऐकताच  सरांनी आम्हाला उभे केले.  ज्या सरांनी  चार वर्षात वर्गातील मुलांना टप्पल देखील मारली नव्हती, त्यांनी आमची चांगलीच धुलाई केली. आवडते सर असल्याने काय चुकले विचारण्याची सोय नव्हती.  

           संध्याकाळी शाळा सुटल्यावर घरी परतताना सरांना विचारले आज वर्गात आमचे काय चुकले ? सर म्हणाले 'माझ्या विद्यार्थ्यांचा गट असू शकतो , त्यांची  टीमअसू शकते , त्याचा संघ असू शकतो पण गॅंग असू शकत नाही.'


             त्यावेळी याचा अर्थ किती कळला होता माहित नाही पण गॅंग शब्दाला नकारात्मकता आहे आणि टीम या शब्दाला सकारात्मकता आहे, एवढेच कळले.
             आज अध्यापक म्हणून या प्रसंगाकडे मागे वळून बघताना माझ्या विद्यार्थ्यांनी कसे असायला पाहिजे याबद्दल परीक्षेतील उत्तम यश, ज्ञानातील उत्तमता, कौशल्यातील उत्तमता यापुढे जाऊन गुणातील /मूल्यातील उत्तमता याचा विचार आपण करतो का ? याबद्दल मला प्रश्न पडतो.

            याबाबत मी माझ्या विद्यार्थ्यांनी कोणता शब्द वापरावा, कोणता वापरू नये, कोणती कृती करावी, कोणती करुनये याबद्दल दामले सरां एवढा  मूल्यात्मक आग्रह  धरतो का ? धरू शकतो का ? असा प्रश्न मनात येतो आणि  आपण असेच आग्रही असावे लागेल याबद्दलचा विचार दृढ होतो.

प्रशांत दिवेकर 
२७ एप्रिल २०२०

Comments

  1. खरंय सर,आग्रही व्हावेच लागते .अतिशय भावणारा लेख आहे.

    ReplyDelete
  2. B.Ed. Internship साठी इंग्रजी मिडीयम च्या वर्गात गेलो होतो. एका मुलानी *अरे यार* असा slang word वापरला.
    त्यावर त्यांच्या टीचर म्हणाल्या.
    Don't use these slang words, this is bad manners.
    त्या कितीपत बरोबर आहेत??

    ReplyDelete
  3. Purva - खूप छान,

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

बौद्धिक विकसनासाठी वाचन

  बौद्धिक विकसनासाठी वाचन ‘वाचन कर’ असे सुचवल्यावर काहीजणांना आनंद होतो तर अनेकजणांच्या कपाळावर आठ्या उमटतात. का वाचायचे ! कसे वाचायचे ! कशासाठी वाचायचे ! वाचताना काय करायचे ! वाचून झाल्यावर काय करायचे ! वाचून काय होणारें !!     असे अनेक प्रश्न , प्रतिक्रिया अनेकांच्या मनात डोकावत असतात. त्याची उत्तरे शोधण्याचा जो प्रयत्न करतो त्याला ‘वाचन कर’ सुचवल्यावर आनंद होण्याची शक्यता जास्त असते. वाचकाचा   पहिला सामना होतो तो वाचनाच्या तंत्राशी. अक्षरे, जोडाक्षरे , विरामचिन्हे अशा सांकेतिक लिपीतील चिन्हांशी मैत्री करत वाचक अर्थापर्यंत म्हणजेच शब्दापर्यंत येऊन   पोचतो आणि इथे खरे वाचन सुरू होते. अनेक वाचक या सांकेतिक चित्रांच्या जंजाळातच गुरफटतात. चिन्हांशी मैत्री झाली की अर्थाच्या खोलात डुबी मारण्यासाठी वाचक,   शब्द आणि शब्दांच्या अर्थछटा,   समानार्थी, विरुद्धअर्थी शब्द, वाक्प्रचार, वाक्य अशा टप्प्यात प्रवेश करतो. वाक्याला समजून घेत परिच्छेद, निबंध अशा शब्दसमूहात वाचक प्रवेश करतो. शब्दाच्या, वाक्याच्या अर्थछटा समजून घेत पूर्वज्ञानाशी सांगड घालत आपल्...

From Pages to Naturalists' Insights

                                            From Pages to Naturalists' Insights                                               Learning while Reading:                                                    Cry of the Kalahari I am a voracious reader, always eager to explore different genres of literature across various domains of knowledge. As a Maharashtrian and initially a Marathi medium student, I preferred reading in Marathi but gradually transitioned to reading books in English. Before pursuing natural science for my graduation, I was introduced to the lives and works of naturalists through books like Ashi Manasa Ashi Sahas, Chitre An...

बोलतो मराठी !....वाचतो मराठी !!

  बोलतो मराठी ! ....वाचतो मराठी  !! या महिन्यात तीन वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके वाचनात आली. त्यातील ग्रंथालयात आलेले एक नवीन पुस्तक   ‘मी कधीही माफी मागणार नाही !’ एका व्यक्तीला झालेले ध्येय दर्शन आणि त्या ध्येय दर्शनातून कळलेला जीवन उद्देश साध्य करण्यासाठी , आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर स्वतः समोर ठेवलेली उद्दिष्टे ... मग ती उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी मिळवलेल्या शारीरिक , मानसिक , बौद्धिक क्षमता आणि प्रयत्नांची पराकाष्ठा ! प्रयत्नांच्या यशापयशातून धडपडत पण समाधानाने केलेला जीवन प्रवास !!..            ‘ मी कधीही माफी मागणार नाही!’ हे श्री. पांडुरंग खानखोजे यांचे चरित्र वाचत असताना मनात विचार येत होता की , जीवनाच्या पाठशाळेत अशा ‘स्व’ च्या शोधाचा प्रवास काहींनाच पूर्ण करता येतो. जीवनाच्या पाठशाळेत ‘स्व’च्या शोधाचा मार्ग ज्यांना सापडला त्यांच्या जीवनाचे सार सांगणारी   सूत्रं कोणती ? आणि   कठीण काळात देखील अशा व्यक्तींची इच्छा कशी प्रबळ राहते ?            दुसरे ...