मे महिन्यात शिक्षक प्रशिक्षण वर्गासाठी वर्ध्याला प्रवास
झाला. संध्याकाळी सेवाग्राम आश्रम , पवनार आश्रम दर्शनाला गेलो होतो. एक
संध्याकाळ पवनार आश्रम दर्शन व आ. गौतमजी बजाज यांच्या भेटीला आवर्जून गेलो
होतो. आ. गौतमजी ज्ञान प्रबोधिनी-सोलापूरच्या द्विदशक पूर्तीच्या
समारोपाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होते. चार दिवस सोलापूर;हरळीला
त्यांच्या सहवासाचा योग आला होता.
त्यावेळी सोलापूरच्या शैक्षणिक उपक्रमांचा त्यांना परिचय करून देताना साहस शिबिरांबद्दल निवेदन केले. रॅपलिंग, घोडसवारी पासून सर्व उपक्रमांचे तपशील सांगितले. गौतमजींनी उपक्रमांचे तपशील प्रश्नोत्तरात जाणून घेतले. या उपक्रमातून साहस, वीर रस विकसित होईल या बद्दल कौतुक केले .
शेवटी त्यांनी एक प्रश्न विचारला " आपल्याला प्रबोधिनीत मुलांना साहसी बनवायचे आहे का निर्भय ? "
त्यांच्या या प्रश्नाने एखाद्या उपक्रमाचा हेतू उद्दिष्ट ठरवताना विचार करायची वेगळी चौकट मला सापडली.
गेल्या 7-8 वर्षात या बद्दल झालेल्या विचारावर तासभर गौतमजींबरोबर छान गप्पा झाल्या .
गौतमजी खरंतर " द बजाज " कुटुंबातील, 1951 साली विनोबांनी लँड रिफार्मचा खास भारतीय अध्यात्मिक प्रयोग सुरू केला " भूदान यात्रा " ! गौतमजी यावेळी 13 वर्षांचे होते. विनोबांनी या 13 वर्षाच्या गौतमला बरोबर येणार का विचारले. काही महिने हा प्रवास असेल असा विचार करून गौतमजींच्या कुटूंबाने त्यांना विनोबांबरोबर जाण्यास परवानगी दिली. काही महिन्यासाठी विनोबांबरोबर सुरु झालेली ही यात्रा 13 वर्ष चालली आणि या प्रवासात गौतमजी आयुष्यभरासाठी व्रतस्थ गांधीवादी झाले. गप्पांमध्ये विनोबांबरोबरच्या आठवणींपासून आजच्या परिस्थितीबद्दल बोलताना त्यांचा अध्यात्मिक विचार व शाश्वत विकासाचे त्याचे भारतीय प्रतिमान यांचे दर्शन होत होते.
गौतमजींच्या या प्रवासाबद्दल त्यांच्या दोन मुलाखती उपलब्ध आहेत
आज आश्रमातील साधकांचे सरासरी वय 75 आहे. सत्याचा शोध घेण्यासाठी सत्याचे प्रयोग करणारे साधक आधीच दुर्मिळ आहेत , त्यांचा हा जीवन साधना प्रवास जाणून घेण्यासाठी वर दिलेल्या लिंकमधील गौतमजींची मुलाखती जरूर पहा.
प्रशांत दिवेकर
ज्ञान प्रबोधिनी
मे २०१८
Comments
Post a Comment