Skip to main content

नव आव्हाना घेतो

नव आव्हाना घेतो 
समुद्र किनारी वाळूच्या पुळणीवर भटकंती करत असताना पुळण व समुद्र ह्यांची हद्द वेगळी करणाऱ्या क्षेत्रात वाळूवर पळणारी एक वेल सापडली ; ' मर्यादवेल '. 
पुळण जणू समुद्राचे अंगण. ह्या अंगणाची सीमा बांधते मर्यादवेल. अमर्याद ताकद असलेला समुद्र पुळणीने स्वतःला जणू मर्यादून घेतो. उधाणाच्या वेळेस आपले मर्याद क्षेत्र अधोरेखित करणाऱ्या मर्यादवेलीला भेटायला येतो ; स्वतःची ताकद सीमा क्षेत्रातच ठेवायची आहे ह्याची स्वतःला आठवण करून देतो . पावसाळ्यात क्वचित सीमा ओलांडून स्वतःची ताकद आजमावून देखील बघतो.

              समुद्र , नदी , पहाड यांच्या आपापल्या क्षेत्राच्या मर्यादसीमा दाखवणाऱ्या खुणा, संकेत जागोजागी उमटवत असतात. कधी वनस्पतीच्या रुपात,कधी प्राणीरुपात,कधी विशेष रंगाच्या मातीत. कधी मूर्त तर कधी अमूर्त.  भटकंती करताना हे संकेत जागोजागी सापडतात. मानवाला हे संकेत दिसायला हवेत, समजायला हवेत आणि उमजायला हवेत. 

 माणसाचे काम आशा मर्यादवेल शोधणे. हे मर्याद क्षेत्र जाणून स्वतःचे क्षेत्र निश्चीत करणे. पण माणूस निसर्गाचे मर्याद संकेत विसरतो , त्यांच्याकडे कधी अजाणता , कधी जाणीवपूर्वक, कधी उद्दामपणे डोळेझाक करतो. नदीच्या पूर मैदानात घरे बांधतो , खाड्यांमध्ये भराव घालून टोलेजंग आकाशस्पर्शी इमले उभारतो, बीच रिसॉर्ट उभारतो. दगडफूल आणि मॉसची वाढ हवेतील संतुलनाची मर्यादा दाखवून हवेच्या प्रदूषणाच्या पातळीबद्दल संकेत देत असते. पण त्याकडे दुर्लक्ष करून माणूस वाहने आणि कारखानदारीच्या वाढीत मशगू ल आहे. 
माणूस  मर्यादाना ओलांडून अमर्याद झाल्याच्या आनंदात मशगूल होतो आणि  स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घेतो. 

मग .. एखादी सुनामीची लाट .., एखादा अवकाळी पाऊस.....  , एखादा महापूर..... , एखादी महामारी.........!!!!! 

एका फटकाऱ्यात मानवाला किनाऱ्यापासून दूर लोटते, एखादी कोसी बंधनातून मुक्त होते, काही तासांचा पाऊस मुंबईला स्वतःच्या लपेटीत घेतो, एखादा पूर सांगली-कोल्हापूरला वेढून  टाकतो, एखादी महामारी महिनोंमहिने माणसाला घरात कोंडून घ्यायला भाग पाडते. 

 खरच मानवी गरजा, इच्छा, आकांक्षा, हव्यासाची ' मर्यादवेल ' कुठे आहे ?.... ...आहे का !!

                   गावातील इमला, मळ्यातील घर , तालुक्याच्या गावी घर ....... शहरातील फ्लॅट , वीकएंड होम , हॉलिडे होम .........जमिनीचा प्रत्येक तुकडा आपण विकायला आणि वापरायला काढला आहे. 
निसर्गाला पुसत आपण निसर्गाच्या जवळ जायचा प्रयत्न करतोय. 
निसर्गाचा शेजार करायच्या ऐवजी त्याच्या अंगणाला आपले अंगण मानू लागलो. 
आपण त्याच्या अंगणाचा भाग आहोत , तो आपल्या अंगणाच्या कुंपणा पलीकडे अमर्याद आहे. 

 महामारीच्या काळातील मानवाच्या गृहवासाने निसर्ग  त्याच्या सीमा परत अधोरेखित करून घेत आहे. आकाश निरभ्र होत आहे, तारे पुन्हा लुकलुकायला लागले आहेत, हिमशिखरे क्षितिजावर प्रकट झालीय आहेत, गंगेमध्ये  डॉल्फिन दिसू लागले आहे, मोरांचा केका ऐकू येऊ लागला आहे ...... 
 हरवलेला बहर पुन्हा बहरत आहे. 

    मर्यादा का कुंपण , 
मर्याद रेषा का लक्ष्मण रेषा ! 

मानवी इच्छा , मानवी वर्तन , मानवाच्या आकांक्षा ...... माणूस माणसाला; माणसाच्या वर्तनाला; स्वातंत्राला कुंपण तरी घालतो किंवा लक्ष्मण रेषेत बद्ध करून टाकतो. 
धर्म ; संस्कृती रक्षणाच्या नावाखाली काय ल्यावे , काय करावे काय करू नये ह्यांच्या बंदी उभारतो किंवा तथाकथित धर्म ; संस्कृतीचे बंधन झुगारून देण्याचा नावाखाली वागण्याचे विधिनिषेध विसरतो.

 विकास म्हणजे इच्छा आणि हाव ह्यातील मर्यादा आखता येणे 
 बंध मुक्तता म्हणजे स्वातंत्र्य आणि स्वैराचार ह्यातील मर्यादा बांधता येणे 
लोकशासन म्हणजे अधिकार आणि जबाबदारीची सीमा कळणे. 

तुम्ही कोणती मर्यादवेल धारण करता तो तुमचा धर्म.
मानवी आकांषेचे क्षितीज अमर्याद आहे , असायलाच हवे .
पण 
या महामारी नंतर माणूस नवीन मर्यादा धारण करून नवे संकेत, नवा जीवनक्रम स्विकारणार
का  जागा न होता पुन्हा जुन्याच स्वप्नांत, विकासाच्या प्रतिमानात मशगूल राहणार ?  
  

       "मर्यादांनी मर्यादून ? छे !! त्यांना उल्लंघुनी
          पुढे पुढे चालणे असू दे हेच ध्येय तव मनी "

प्रशांत दिवेकर
ज्ञान प्रबोधिनी, पुणे

Comments

  1. अतिशय सुंदर प्रेरणादायी लेख.

    ReplyDelete
  2. खरोखर!वास्तव!छान लिहिलंय.

    ReplyDelete
  3. कळतय.. आता वळेल पण अशी आशा..

    ReplyDelete
  4. वास्तवाची जाणीव करून देणारा लेख , अतीव सुन्दरम् !!

    ReplyDelete
  5. वास्तव संदेश... !

    ReplyDelete
  6. अतिशय सुंदर लेख

    ReplyDelete
  7. सुंदर लेख. अनादि कालापासूनच या बाबत भारतीय संस्कृतीतील अनेक कृतीशील विचारवंतानी या बद्दल मार्गदर्शन करून ठेवलेले आहे. उदा: भग्वद्गीते मध्ये भगवान श्रीकृष्णाने शब्द वापरला आहे 'युक्त' "युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु ...व्यक्ती, समाज, देश, काल, परिस्थितीनुसार युक्त सुद्धा बदलते. 'अत्याचार' हा सुद्धा असाच गमतीदार शब्द आहे 'अति' + 'आचार'. भारतीय परंपरा स्वातंत्र्य देते मर्यादा सुद्धा त्या बरोबरीनेच परिणामांची जबाबदारी माझीच आहे याची जाणीव देते. Dogmatic आणि rigid नाही लवचिक आणि देशकालानुरूप वर्तन सांगते.

    ReplyDelete
  8. प्रिय प्रशांत,
    मुक्त चिंतनाची सुरवात तर छान झाली आहे. निसर्गात अनेक ठिकाणी आपल्याला दोन पर्यावरणाच्या संस्थाची सीमा रेखा दिसते. ही काही कोणी आखून दिलेली मर्यादा नसते तर ती dynamic balancing मधून व्यक्त झालेली असते. निसर्गात संतुलन सर्वत्र दिसते मग ते मानवाला कसे लागू नसेल? तू म्हणतोस ते बरोबर आहे, अनेक वेळा आपल्याला ह्या संतुलनाचा विसर पडतो. त्याचे परिणाम पण भोगावे लागतात.
    मानवाची प्रगति म्हणजे नवनिर्मितीमधून साधलेल्या नव्या संतुलनाचा इतिहास. हे जर संतुलन साधले तर समुद्र सपाटीच्याखाली एक देश उभा करता येतो नाहीतर अनेक वर्षे वसलेली गावे वाहून जाताना दिसतात. हे नवीन संतुलन साधण्याचा जर विश्वास नसेल तर मग रूढीची बंधने आणि संकृतीच्या लक्ष्मण रेष्या यांची निर्मिती होते. अव्यक्त भविष्या पेक्ष्या परिचित भूतकाळ बरा वाटतो पर्यायाने नवनिर्मितीचे प्रगतिचे मार्गच बंद केले जातात.
    या महामारीच्या मधील गृहवासा नंतर मानव जात कोणता मार्ग निवडते हे एक कोडेच आहे. बदल होणार हे नक्की.
    तू म्हणतोस
    "मर्यादांनी मर्यादून ? छे !! त्यांना उल्लंघुनी
    पुढे पुढे चालणे असू दे हेच ध्येय तव मनी "
    पण याच बरोबर संतुलनाचा विसर पडणार नाही हे लक्षात राहावे. मागील प्रगतीचा मार्ग व जीवन शैली यांनी पर्यावरणाची हानी झाली हे खरे. पण जेव्हा याची जाणीव होऊन पर्यावरणाच्या नैसर्गिक चक्राच्या गुंतागुंतीच्या कार्याचा अभ्यास केला गेला तेव्हा संतुलनाची अनेक सूत्रे समजून आली. आता तरी फक्त झाडे लावा आणि पर्यावरण वाचवा सारखा बाळबोधा विचार सोडून देऊन खरे शास्वत संतुलन साधण्याचा प्रयत्न्न व्हावा. नाहीतर मर्यादा भंगातून मुखंभंग होणार हे नक्की.
    रवींद्र आपटे
    01/05/2020

    ReplyDelete
  9. खूप छान मांडलं आहेस ।

    ReplyDelete
  10. अपर्णा गोवंडेMay 4, 2020 at 7:26 PM

    विचारांची खूप छान मांडणी.

    ReplyDelete
  11. अपर्णा गोवंडेMay 4, 2020 at 7:56 PM

    विचारांची खूप छान मांडणी.

    ही मर्यादावेल दिसण्याचा अंत:चक्षू मानवाला लाभो व तद्नुषंगिक कृती घडो।

    सांगली, कोल्हापूर, पुणे इ ठिकाणांचे महापूर, जगभरातील वणवे,.. आत्ताची महामारी, या घटना मानवाने मर्यादा ओलांडल्याची मोजलेली किंमत आहे.

    आतातरी इच्छा, विकास, गरज, भूक यातील छटा
    अधिकार, हक्क, कर्तव्य यांची योग्य ती समज मानवाला येवो,

    व Lock down नंतर चे चित्र चांगल्या बदलाची नांदी ठरो।

    ReplyDelete
  12. अतिशय अर्थपूर्ण शब्दांमध्ये आणि खूप जोशा मध्ये मांडलेला आहे प्रेरणादायी मर्यादा वेल हा शब्द अतिशय अर्थवाही आहे सुरेख

    ReplyDelete
  13. छान लिहिले आहे सर. अंतर्मुख होऊन विचार करायला भाग पाडणारे लेखन

    ReplyDelete
  14. खूप छान! विचार करायला लावणारा लेख!

    ReplyDelete
  15. खूपच चांगला लेख प्रशांतदादा ✍️अंतर्मुख करायला लावणारा विचार . मर्यादांची जाणीव निर्माण करणारे लेखन .

    ReplyDelete
  16. खूप छान मांडणी!

    ReplyDelete
  17. मर्यादा वेल हा शब्दच भावला खूप

    ReplyDelete
  18. खूप छान आणि मूलभूत वेगळं लिहिलं आहेस...
    मर्यादा उल्लंघन समजून घ्यावे, पुढे पुढे चालणे शाश्वत असावे याबद्दल लिहावे..
    खूप शुभेच्छा !!

    ReplyDelete
  19. अतिसुंदर

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

बौद्धिक विकसनासाठी वाचन

  बौद्धिक विकसनासाठी वाचन ‘वाचन कर’ असे सुचवल्यावर काहीजणांना आनंद होतो तर अनेकजणांच्या कपाळावर आठ्या उमटतात. का वाचायचे ! कसे वाचायचे ! कशासाठी वाचायचे ! वाचताना काय करायचे ! वाचून झाल्यावर काय करायचे ! वाचून काय होणारें !!     असे अनेक प्रश्न , प्रतिक्रिया अनेकांच्या मनात डोकावत असतात. त्याची उत्तरे शोधण्याचा जो प्रयत्न करतो त्याला ‘वाचन कर’ सुचवल्यावर आनंद होण्याची शक्यता जास्त असते. वाचकाचा   पहिला सामना होतो तो वाचनाच्या तंत्राशी. अक्षरे, जोडाक्षरे , विरामचिन्हे अशा सांकेतिक लिपीतील चिन्हांशी मैत्री करत वाचक अर्थापर्यंत म्हणजेच शब्दापर्यंत येऊन   पोचतो आणि इथे खरे वाचन सुरू होते. अनेक वाचक या सांकेतिक चित्रांच्या जंजाळातच गुरफटतात. चिन्हांशी मैत्री झाली की अर्थाच्या खोलात डुबी मारण्यासाठी वाचक,   शब्द आणि शब्दांच्या अर्थछटा,   समानार्थी, विरुद्धअर्थी शब्द, वाक्प्रचार, वाक्य अशा टप्प्यात प्रवेश करतो. वाक्याला समजून घेत परिच्छेद, निबंध अशा शब्दसमूहात वाचक प्रवेश करतो. शब्दाच्या, वाक्याच्या अर्थछटा समजून घेत पूर्वज्ञानाशी सांगड घालत आपल्...

From Pages to Naturalists' Insights

                                            From Pages to Naturalists' Insights                                               Learning while Reading:                                                    Cry of the Kalahari I am a voracious reader, always eager to explore different genres of literature across various domains of knowledge. As a Maharashtrian and initially a Marathi medium student, I preferred reading in Marathi but gradually transitioned to reading books in English. Before pursuing natural science for my graduation, I was introduced to the lives and works of naturalists through books like Ashi Manasa Ashi Sahas, Chitre An...

बोलतो मराठी !....वाचतो मराठी !!

  बोलतो मराठी ! ....वाचतो मराठी  !! या महिन्यात तीन वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके वाचनात आली. त्यातील ग्रंथालयात आलेले एक नवीन पुस्तक   ‘मी कधीही माफी मागणार नाही !’ एका व्यक्तीला झालेले ध्येय दर्शन आणि त्या ध्येय दर्शनातून कळलेला जीवन उद्देश साध्य करण्यासाठी , आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर स्वतः समोर ठेवलेली उद्दिष्टे ... मग ती उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी मिळवलेल्या शारीरिक , मानसिक , बौद्धिक क्षमता आणि प्रयत्नांची पराकाष्ठा ! प्रयत्नांच्या यशापयशातून धडपडत पण समाधानाने केलेला जीवन प्रवास !!..            ‘ मी कधीही माफी मागणार नाही!’ हे श्री. पांडुरंग खानखोजे यांचे चरित्र वाचत असताना मनात विचार येत होता की , जीवनाच्या पाठशाळेत अशा ‘स्व’ च्या शोधाचा प्रवास काहींनाच पूर्ण करता येतो. जीवनाच्या पाठशाळेत ‘स्व’च्या शोधाचा मार्ग ज्यांना सापडला त्यांच्या जीवनाचे सार सांगणारी   सूत्रं कोणती ? आणि   कठीण काळात देखील अशा व्यक्तींची इच्छा कशी प्रबळ राहते ?            दुसरे ...